बेंगळुरुत दिग्विजय सिंहांना पोलिसांनी घेतले ‘ताब्यात’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – मध्य प्रदेशातील सत्तासंघर्ष दिवसेंदिवंस उत्कंठा वाढवणारा होत चालला आहे. मागील दोन-तीन दिवसात राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये पत्र पाठवा-पाठवी सुरू आहे. यादरम्यान काँग्रेसचे वरीष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह आज पक्षाच्या बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी बेगळुरूला पोहचले आहेत. आमदारांना भेटण्याची परवानगी न मिळाल्याने दिग्विजय सिंह यांनी हॉटेल रमाडाच्या बाहेर धरणे धरले. बेंगळुरुमध्ये हॉटेलच्या बाहेर धरणे धरणार्‍या दिग्विजय सिंह यांना खबरदारी म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, मध्य प्रदेश काँग्रेसने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून भाजपावर आपल्या 16 आमदारांचे अपहरण करून ओलिस ठेवल्याचा आरोप केला आहे. याचिकेत प्रदेश काँग्रेसने सुप्रीम कोर्टाला त्यांच्या आमदारांना भाजपाच्या कैद्येतून सोडवण्याची मागणी केली आहे. यासोबतच काँग्रेसने याचिकेत म्हटले की, या 16 आमदारांशिवाय विधानसभेत फ्लोअर टेस्ट होऊ शकत नाही.

प्रदेश काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी एका प्रेस कॉन्फ्रेंसद्वारे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर टीका केली. बंडखोरांनी म्हटले की, ते भाजपात जाण्याचा विचार करत आहेत. त्यांनी सीएम कमलनाथ यांच्यावर टीका करताना म्हटले की, त्यांच्या सरकारमध्ये आमची दखल घेतली जात नाही. सीएमकडे आमचे म्हणणे ऐकण्यास वेळ नाही, त्यांचे पूर्ण लक्ष छिंदवाडाकडे असते. येथे सर्व लोक आपल्या मर्जीने आले आहेत.