‘संजय राठोडांचं नेतृत्व संपवण्याचं कटकारस्थान’, गंभीर आरोप करत सरपंचानं दिला भाजप सदस्यत्वाचा राजीनामा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर आता राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापताना दिसत आहे. पूजानं मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून आत्महत्याचा आरोप भाजप करत आहे. इतकंच नाही तर भाजप शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेत हल्ला चढवत आहे. अनेक आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. एकीकडे राठोडांवर आरोप होत आहेत तर काही लोक त्यांच्या समर्थनार्थ पुढं येतानाही दिसत आहेत.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात असणाऱ्या काळवटी तांडा येथील सरपंच कमल नाथराव चव्हाण यांनी गंभीर आरोप करत आपला राजीनामा दिला आहे. चव्हाण यांनी भाजप प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे मंगळवारी राजीनामा पाठवत राठोड यांचं समर्थन केलं आहे.

पत्रात नेमकं काय लिहिलं ?
या पत्रात लिहिलंय की, मी कमल नाथराव चव्हाण काळवटी, ता. अंबाजोगाई जि. बीड येथील सरपंच म्हणून माझ्या भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देत असून त्याचा स्विकार करण्यात यावा. राजीनाम्याचं कारण म्हणजे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भाजप पक्षामधील नेते वेळोवेळी महाराष्ट्रातील ओबीसी नेतृत्व व बंजारा समाजातील उच्च पदस्थ लोकनेते संजय राठोड यांना संपवण्याचे कटकारस्थान करत असल्याचं मला जाणवत आहे असा गंभीर आरोप कमल चव्हाण यांनी केला आणि राजीनामा दिला.

संजय राठोडांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांचा मोर्चा
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण समोर करून वनमंत्री संजय राठोड यांना बमनामा केलं जात असल्याचा आरोप यवतमाळ येथील शिवसैनिकांनी केला आहे. मंगळवारी नेर येथे शिवसैनिकांनी भाजपचा निषेध करत शहरातून महिला पुरुषांच्या सहभागात मोर्चा काढला. यावेळी विविध प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. यानंतर प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.

संजय राठोड मौन सोडणार ?
दरम्यान संजय राठोड येत्या गुरुवारी माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे. वाशिम जिल्ह्यात पोहरा देवी हे गाव आहे या ठिकाणी बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराजांचं मोठं मंदिर आहे. बंजारा समाजाचे धर्मगुरू आणि महंत याच मंदिरात असतात. गुरुवारी या मंदिरात येऊन धर्मगुरुंच्या साक्षीनं संजय राठोड आपली भूमिका मांडणार असल्याचं बोललं जात आहे.

नेमकं प्रकरण काय ?
बीड जिल्ह्यातील परळी येथे राहणाऱ्या पूजा चव्हाण नावाच्या एका 22 वर्षीय तरुणीनं पुण्यातील वानवडी येथील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. रविवारी दि 7 फेब्रुवारी 2021 रोजी ही घटना घडली होती. यानंतर आता या प्रकरणाला वेगळं वळण लाागलं आहे. सुरुवातीला महाविकास आघाडीतील कथित मंत्र्याचं नाव घेतलं जात होतं. परंतु भाजपच्या महिला उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी थेट वनमंत्री संजय राठोड याचं नाव घेतल्यानं खळबळ उडाली होती. या प्रकरणी भाजपकडून पुरावा म्हणून काही ऑडिओ क्लीप्सही देण्यात आल्या आहेत. पूजा सोशल मीडियावर खूप फेमस होती. त्यामुळं याचे पडसाद तिथंही उमटल्याचं दिसत आहेत. सोशलवर देखील निरनिराळ्या चर्चा सुरू आहेत. इतकंच नाही तर 8 दिवसांपासून संजय राठोड गायब असल्यानं भाजप नेते अधिकच आक्रमक झाले होते.