भाजपा कार्यकर्त्यांच्या WhatsApp ग्रुपवर वरिष्ठ नेत्यानं पाठवला चक्क अश्लील व्हिडीओ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानमधील भाजपचे वरिष्ठ नेता आणि माजी मंत्री असणार्‍या कालूलाल गुर्जर यांच्या मोबाइल नंबरवरुन पक्षाशी संबंधित व्हॉट्सअप ग्रुपबरोबरच अन्य ग्रुपमध्ये अश्लील व्हिडिओ पाठवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. कालूलाल यांच्या क्रमांकावरुन अनेक ग्रुपवर अश्लील व्हिडिओ शेअर करण्यात आल्यामुळे राजस्थानच्या राजकारणामध्ये प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली आहे. कालूलाल यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कालूलाल यांनी माझ्या फोनचा दुरुपयोग करुन राजकीय प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने हे केले असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मागील विधानसभा निवडणुकींमध्ये ज्या लोकांनी मला हरवले होते, त्याच लोकांचा या कटामध्ये सहभाग असल्याचा आरोपही कालूलाल यांनी केला आहे. माझी राजकीय प्रतिमा ही स्वच्छ असून याचा फायदा होऊन पुढील विधानसभा निवडणुकीमध्ये मला निवडणूक लढण्याची संधी मिळू नये यासाठी हा कट रचल्याचा आरोप कालूलाल यांनी केला आहे.

भाजप किसान मोर्चाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष कमलेंद्र सिंह गुढा यांनी कालूलाल यांच्याविरोधात मांडल पोलीस स्थानकामध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत तक्रार दाखल केली आहे. भाजपाच्या मांडल, सहाडा आणि भीलवाडा विभागांशी संबंधित व्हॉट्सअप ग्रुपवर मंत्र्यांच्याच मोबाइल क्रमांकावरुन पोस्ट करण्यात आलेला अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांना धक्का बसल्याचे गुढा यांचे म्हणणे आहे. कालूलाल यांनी महिलांच्या अश्लील क्लीप पक्ष कार्यकर्त्यांच्या ग्रुपवर पोस्ट केल्या आहेत. याचविरोधात मी तक्रार दाखल केली आहे, असं गुढा म्हणाले. या प्रकरणात आता पोलीस चौकशी करत आहेत.