लोकसभेची रणधुमाळी : मराठवाड्यात प्रकाश आंबेडकरांनी केली ४ उमेदवारांची घोषणा 

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा चांगलाच सपाटा लावला असून काँग्रेस सोबत आघाडीची बोलणी संपली असल्याचे देखील त्यांनी मागे म्हणले आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आपले उमेदवार जाहीर करण्याची घौडदौड सुरु केली आहे. प्रकाश आंबेडकरांनी परभणीत सत्ता संपादन सभेत माजी न्यायमूर्ती आणि सामाजिक कार्यकर्ते बी जी कोळसे-पाटील यांची हि उमेदवारी जाहीर केली आहे.

महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जागा लढवण्याचा निर्धार केलेल्या प्रकाश आंबेडकरांनी काल मराठवाड्यातील चार मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद मधून बी.जी कोळसे पाटील हे उमेदवार असणार आहेत. तर बीड मधून  प्रा. विष्णू जाधव, उस्मानाबादमधून अर्जुन सलगर हे उमेदवार असणार आहेत. रावसाहेब दानवे यांच्या जालना या बालेकिल्ल्यात डॉ. शरद वानखेडे हे वंचितची उमेदवारी करणार आहेत.

मराठवाड्यातील उर्वरित हिंगोली आणि परभणीतील उमेदवार जाहीर करण्याचे प्रकाश आंबेडकर यांनी बाकी ठेवले असून या उमेदवारांची घोषणा २३फेब्रुवारीला करण्यात येईल असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे.