‘CAA चा 40 % हिंदूंनाही बसणार फटका, लवकरच यादी जाहीर करू’ : प्रकाश आंबेडकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. नागरिकत्व राष्ट्रीय नोंदणी (NRC) आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (CAA) विरोधात वंचित आघाडीने 24 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली असून या पार्श्वभूमीवरच ही भेट झाल्याचे समजते आहे. मुख्यमंत्र्याच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले कि, ‘केंद्र सरकार लागू करत असलेल्या NRC आणि CAA या कायद्याचा 40 टक्के हिंदूंनाही फटका बसणार आहे. कारण, हिंदू धर्मातही अनेक नागरिकांकडे कागदपत्रे नाहीत. अशा नागरिकांची यादी आम्ही जाहीर करणार आहोत, या यादीत मुस्लिमांचा समावेश नसेल, कारण मुस्लीम समाज अगोदरच या कायद्याविरोधात रस्त्यावर उतरला आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीदरम्यान महाराष्ट्र बंदसंदर्भात चर्चा झाली. हा बंद शांततेत करण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. आम्ही काही दिवसांपूर्वी NRC आणि CAA विरोधात दादर टीटी इथंही आंदोलन केलं होतं. ते आंदोलनही शांततेत पार पडलं होतं. त्यामुळे 24 जानेवारीचा महाराष्ट्र बंदही आम्ही शांततेतच पार पाडू, असं आंबेडकर यांनी सांगितलं.

काँग्रेस पक्षाने CAA कायद्याला पूर्णपणे विरोध दर्शविला. मात्र असं असतानाच काँग्रेसचे माजी खासदार कपिल सिब्बल यांनी हा कायदा सर्व राज्यांना लागू करावाच लागेल असं म्हटलं असून तो लागू करण्यापासून कुठलंही राज्य नकार देऊ शकत नाही असंही म्हणत आहे. केरळ लिटररी फेस्टीव्हलमध्ये बोलताना त्यांनी हे मत व्यक्त करत केलं, दरम्यान त्यांच्या या वक्तव्यांनंतर आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिल्याचं बोललं जात आहे. यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘केंद्राचा कायदा सर्व राज्यांना लागू होतो ही गोष्ट खरी आहे. पण राज्यांना वेगळं मत मांडण्याचा अधिकार देखील आहे.’

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी नाईट लाईफबद्दल विधानाचा प्रकाश आंबेडकर यांनी समर्थन केलं आहे. ‘मी नाईट लाईफ जगतच मोठा झालो आहे. ज्यांना मुंबईची माहिती नाही तेच याला विरोध करत आहेत,’ असं मत प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केलं.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/