प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री ?

पणजी :  वृत्तसंस्था – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर मुख्यमंत्रीपद रिक्त झाले आहे . गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी भाजपचे प्रमोद सावंत यांची निवड होण्याची शक्यता आहे .  प्रमोद सावंत हे सध्या गोवा विधानसभेचे अध्यक्ष आहेत.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यामधील राजकीय हालचालींना वेग आला आहे .  भाजपाने नव्या मुख्यमंत्र्याचा शोध घेण्यासाठी रात्रभर आमदारांसोबत बैठका घेतल्या . या बैठकीला मित्र पक्ष आणि काही अपक्ष आमदारही उपस्थित होते .  गोवा प्रदेश काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर आणि चंद्रकांत कवळेकर यांनी शनिवारीच राज्यपाल मृदुला सिन्हा यांना पत्र लिहून सत्तास्थापनेचा दावा केला आहे . काँग्रेसच्या सत्तास्थापनेच्या दाव्यानंतर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी मध्यरात्री गोव्यामध्ये दाखल झाले .  गडकरींच्या उपस्थितीत मॅरेथॉन बैठक पार पडली .  पहाटेपर्यंत या बैठकीत मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही तोडगा निघू शकलेला नाही.

प्रमोद सावंत यांचे पारडे जड –

गोवा विधानसभा सभापती प्रमोद सावंत यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी सध्या आघाडीवर आहे .  प्रमोद सावंत साखळी मतदारसंघाचे आमदार असून ते व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत . श्रीपाद नाईक यांचेही नाव चर्चेत होते .  मात्र भाजपाच्या मित्र पक्षांचा नाईक यांना विरोध आहे . गोवा फॉरवर्ड पार्टीचे नेते विजय सरदेसाई यांनी आमच्यासाठी सर्व पर्याय खुले असल्याचं म्हटले आहे . तसेच आम्ही मनोहर पर्रिकर यांना समर्थन दिले होते .  भाजपाला नाही , पर्रिकरांच्या निधनानंतर भाजपा आता काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यानंतर आम्ही आमचा निर्णय जाहीर करू असे सरदेसाई यांनी सांगितले.

आम्हाला मुख्यमंत्रीपदावर संधी द्यावी : मगोप

महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे सुदीन ढवळीकर यांनी देखील मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला आहे . मगोपने सत्तास्थापनेसाठी भाजपाला पाठिंबा दिला होता .  आम्ही बऱ्याचदा भाजपाला पाठिंबा दिला आहे .  आता भाजपाने आम्हाला मुख्यमंत्रीपदावर संधी द्यावी ,  अशी मागणी मगोपने केल्याचे विधानसभेतील उपसभापती मायकल लोबो यांनी सांगितले.

सहकारी पक्षांची भूमिका महत्वाची-

गोव्यात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार असून , त्यात गोवा फॉरवर्ड पक्ष , महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष आणि अपक्षांचा समावेश आहे . या पक्षांनी केवळ पर्रीकर यांच्यासाठीच सरकारला पाठिंबा दिला आहे . आता पर्रीकर यांच्या निधनामुळे हे पक्ष कोणती भूमिका घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे .