शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक ‘गोत्यात’; ‘त्या’ घोटाळ्यात 50 % नफा कमवल्याचा ED चा दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनी लॉड्रिंगप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर व कार्यालयावर छापा टाकला होता. त्यानंतर त्यांचे पुत्र विहंग यांचीही चौकशी केली होती. मध्यस्ती म्हणून काम करणाऱ्या अमित चांडोळे याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी ईडीने केलेल्या दाव्यामुळे प्रताप सरनाईकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

ईडीने एमएमआरडीएच्या सुरक्षा पुरविरण्याच्या झालेल्या घोटाळ्यात ५० टक्के नफा आमदार प्रताप सरानाईक यांनी लाटल्याचे आतापर्यंत नोंदविलेल्या जबाबातून ही माहिती समोर आल्याचे न्यायालयाला सांगितले. दरम्यान, अमित चांडोळे हा यात मध्यस्थी म्हणून काम पाहात हाेता. सरनाईक यांना पैसे पुरवत असल्याचे त्याने कबूल केल्याचेही नमूद केले.

या प्रकरणामध्ये ईडीने उच्च पदस्थांपासून ते लहानातल्या लहान घटकांचे जबाब नोंदवले आहेत. टॉप्स ग्रुपचे उपाध्यक्ष महेश अय्यर यांचाही जबाब नोंदवला आहे. त्यानुसार, २०१४- १५ मध्ये टॉप्स ग्रुप सर्व्हिस अँड सोल्यूशन कंपनीने एमएमआरडीएच्या विविध प्रकल्पाच्या ठिकाणी महिन्याला ३०० ते ३५० सुरक्षारक्षक पुरविण्याचे कंत्राट घेतले. यापैकी अवघे ७० टक्के सुरक्षारक्षक तैनात करत, पूर्ण कामाचे पैसे घेण्यात येत होते. तसेच त्यावर पीएफ आणि ईएसआयसीचाही लाभ घेतला. तसेच टॉप्स ग्रुपचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज बिजलानीला यांना मोठ्या प्रमाणात रक्कम टॉप्स ग्रुपच्या खात्यातून देण्यात आली. यात संकेत मोरे आणि अमित चांडोळे यांची एजेंट म्हणून नेमणूक करत, बनावट कागदपत्रे तयार करून हे दोघे पैसे काढत होते . मिळालेल्या पैशातील ५० टक्के रक्कम कमिशन म्हणून दिली जात होती.

एवढेच नाही तर प्रतिमहा ५० हजार रुपये आणि एका सुरक्षारक्षकामागे पाचशे रुपये महिना अशी रक्कमही दिली जात होती. २०१७ ते जून २०२० या कालावधीत सुमारे सव्वादोन कोटीपैकी ९० लाख रुपये बिजलानी यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच इतर रक्कम संकेत मोरे यांच्या कंपनीला देण्यात आली आहे. राहुल नंदा प्रताप सरनाईक यांचे जवळचे मित्र आहेत. २ कोटी ३६ लाख कमिशन म्हणून शेअर करण्यात आली आहे. त्यापैकी ९० लाख रुपये बँक ट्रान्सफर करण्यात आली आहेत. २०१४ पासून आतापर्यंत ७ कोटी कमिशन म्हणून देण्यात आल्याचे अय्यर यांनी जबाबत म्हटले आहे.

१७५ कोटींचा गैरव्यवहार
टॉप्स ग्रुपचे अध्यक्ष, प्रमोटर असलेल्या राहुल नंदा आणि अन्य सहा जणांनी टॉप्स ग्रुपच्या अकाउंटमधून भारतातल्या वेगवेगळ्या कंपनीत फंड ट्रान्सफर केला. पुढे हाच फंड स्वतःच्या फ़ायद्यासाठी रियल इस्टेटमध्ये गुंतवून १७५ कोटींचा ग़ैरव्यवहार केल्याचा आरोप महेश अय्यर यांनी दिलेल्या तक्रारीत केला आहे.

प्रताप सरनाईकांचा ५० टक्के वाटा
या प्रकरणातील महत्त्वाची कडी म्हणजे नीरज बिजलानी या व्यवहारातील इत्यंभूत माहिती ही त्यांच्याकडेच होती. दि. २४ रोजी ईडीने नीरज बिजलानी यांचाही जबाब नोंदवला, यामध्ये महत्त्वपूर्ण माहिती समोर आली. त्यांनी दिलेल्या जबाबानुसार, सुरक्षारक्षकांसाठी महिन्याला ३० ते ३२ लाखांचे कंत्राट होते. यातील नफ्यात प्रताप सरनाईक यांचा ५० टक्के वाटा होता. टॉप्स ग्रुप आणि त्यांच्यात ५० टक्के भागीदारीत हे काम सुरू होते. याचे प्रॉफिट शेअरिंग शीट फायनान्स विभाग तयार करून, संचालकाकड़ून ते मान्य करून घेत होते. अमित हा त्यांच्यातील मध्यस्थी म्हणून काम करायचा. तो सरनाईक यांचेही पैसे घेत होता. हा फंड रोख रकमेत देण्यात येत होता. यात, ललिता रणदिवे याबाबत रेकॉर्ड ठेवत होती.
याबरोबच राहुल नंदा यांनी लंडन स्थित कंपनी शील्ड गार्डिंग कंपनीसाठी २०० ते २५० कोटी खर्च केले आहे. त्यातून दुबई आणि लंडनमध्ये मालमत्ता खरेदी केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

विश्वासार्हतेवर सुरू होता व्यवहार
व्यवहाराचे रेकॉर्ड ठेवणारी ललिता रणदिवे हिचाही ईडीने जबाब घेतला. त्यात तिने, अमित हा महिन्याला ६ लाख रुपये तिच्याकड़ून घेत असल्याचे सांगितले. हा सर्व व्यवहार नीरज बिजलानीच्या सांगण्यावरून होत होता. त्याची मजुरीचे पैसे म्हणून नोंद केली जात होती.
तर अमितच्या जबाबानुसार, नंदाच्या मार्फत तो सरनाईकांच्या संपर्कात आला. सुरक्षारक्षकांच्या कंत्राटात टॉप ग्रुप आणि सरनाईक हे ५० टक्के भागीदार आहेत. मात्र, कागदोपत्री याची कोठेही नोंद नाही. हे फक्त विश्वासार्हतेवर सुरू होते. त्यामुळे या घोटाळ्यात सहभाग असल्याचा संशय ईडीने न्यायालयात वर्तवला आहे. तसेच अमित तपासाला सहकार्य करत नसल्याचेही यात नमूद केले आहे.

अनेक माजी अधिकाऱ्यांचा वापर
टॉप्स ग्रुपचे अध्यक्ष, प्रमोटर असलेल्या राहुल नंदा यानी २०१६ नंतर स्वतः सह कुटुंबीयांचे टॉप्स ग्रुपच्या संकेत तळावरून नाव कमी केले. अन्य संचालकांची नावे टाकली. तसेच माजी पोलीस महासंचालक सतीश माथूर, आयएएस दिनेश कुमार गोयल, इंडियन ओव्हरसिस बँक माजी अध्यक्ष नरेंद्र मेरपाडी, रिटायर्ड जनरल कमलजीत सिंग यांची स्वतंत्र संचालक म्हणून नेमणूक करत शेरधारकांचा विश्वास मिळविण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांनंतर सरकारी कार्यालयांकडून विविध देणे थकबाकी याबाबतचे पत्र येऊ लागल्याने या सर्वांनी राजीनामे दिले. नंदाच्या हेतूबाबत हे सर्व जण अनभिज्ञ होते, असेही टॉप्स ग्रुपचे उपाध्यक्ष महेश अय्यर यांनी सांगितले.

You might also like