सांगलीत गणेशोत्सवासाठी मोठा बंदोबस्त : पोलीस अधीक्षक शर्मा

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्ह्यात यावर्षी ५१६३ गणेशोत्सव मंडळांची स्थापना करण्यात आली असून गणेशोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी १५०० पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि राज्य राखीव पोलीस दलाचा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, लवकरच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठी गुन्हेगारांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाईचे प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत. प्रतिबंधात्मक कारवाईसाठी १ हजार ६३७ नोटीसा काढल्या आहेत. चांगले काम करणारे नागरिक, संस्था, संघटना, व्यापारी यांच्या सारख्या ५३८ जणांना विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. डॉल्बीच्या आवाजाची मर्यादा ओलांडू नये. ओलांडल्यास कडक कारवाई करण्यात येईल.

गणेशोत्सव आणि मोहरमच्या बंदोबस्तासाठी एसआरपीएफच्या दोन प्लाटून, १२०० होमगार्ड, १०० पोलीस कर्मचारी आणि २० अधिकारी बाहेरुन मागविण्यात आले आहेत. मिरजेतील कृष्णा नदीवरील पूल यावर्षी ५ ते ६ दिवस पाण्याखाली होता. तो पूल कोल्हापूर जिल्ह्यात येतो. याबाबत कोल्हापूरच्या मुख्य अभियंत्यांशी चर्चा झाली आहे. त्या पुलाची गतवर्षी इतकी ताकद राहिलेली नाही. त्यामुळे हा पूल अधिकच्या गर्दी आणि वाहतुकीसाठी फारसा सुरक्षित नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

यावर्षी एक गाव एक गणपती या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. मिरजेतील स्वागत कमानींवर होणार खर्च यावर्षी विधायक कामासाठी वापरण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रात पहिल्यांदाच आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे हे सांगली शहरात बसवण्यात येणार आहेत. येत्या ४५ दिवसात हे कॅमेरे संपूर्ण शहरात बसवले जाणार आहेत. हे कॅमेरे हायटेक असून माणसाच्या चेहरा आणि गाडी नंबर वरून त्याची सर्व माहिती मिळणार आहे. याचा शिस्तपालनासाठी आणि गुन्हेगारांच्या शोधासाठी मोठा उपयोग होणार असल्याचेही अधीक्षक शर्मा यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –