खराब कामगिरीनंतरही पृथ्वी शॉचा सूचक संदेश, म्हणाला…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसापर्यंत सामन्यावर वर्चस्व असलेल्या भारताने तिसऱ्या दिवशी अवघ्या काही तासांमध्ये सामना गमावला. दुसऱ्या डावात अवघ्या ३६ धावांवर डाव संपवणाऱ्या भारतीय संघावर सध्या टीकेची झोड उठत आहे. सलामीवीर पृथ्वी शॉचं दोन्ही डावांत अपयश आणि क्षेत्ररक्षणात सुमार कामगिरी करणं चांगलंच चर्चेत असून सोशल मीडियावर भारतीय चाहत्यांनीही त्याच्यावर टीका करत त्याला दुसऱ्या कसोटीसाठी संघाबाहेर करण्याची मागणी केली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर पृथ्वी शॉने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक सूचक संदेश दिला आहे. तुम्ही एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करत असताना जर इतर लोकं तुम्हाला नाउमेद करत असतील तर याचा अर्थ तुम्ही ती गोष्ट करु शकता आणि इतर नाही…अशा आशयाचा संदेश पोस्ट करत पृथ्वीने आपले इरादे स्पष्ट केलेत.

भारतीय संघावर चहुबाजूंनी टीका होत आहे. त्यातचं विराट कोहली भारतात परतणार असल्यामुळे उर्वरित तीन सामन्यांसाठी भारतीय संघाचं नेतृत्व अजिंक्य रहाणे करणार आहे. पृथ्वी शॉचं अपयश, मोहम्मद शमीला झालेली दुखापत यामुळे अडचणीत सापडलेल्या भारतीय संघासमोर दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी अंतिम ११ चा संघ निवडताना मोठा पेच निर्माण झाला आहे. पहिल्या कसोटीतील सुमार कामगिरीनंतर दुसऱ्या सामन्यासाठी पृथ्वी शॉला संघात जागा मिळण्याची शक्यता कमी आहे. त्याच्या जागेवर सलामीसाठी शुबमन गिल याचा विचार केला जाण्याचे शक्यता आहे. सध्या सर्व बाजूंनी होत असलेल्या टीकेमुळे संघाचं मानसिक धैर्य कमी होण्याची शक्यता आहे.