आधारची माहिती चोरुन तेलगू देशमच्या सेवा मित्र अ‍ॅपसाठी पुरविली

हैदराबाद : पोलीसनामा ऑनलाइन – आंध्र प्रदेशमधील सत्तारुढ तेलगू देशम पक्षाच्या सेवा मित्र अ‍ॅपसाठी आयटी ग्रीड या माहिती तंत्रज्ञान कंपनीने आधार ची माहिती चोरुन पुरविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथोरिटी आॅफ इंडिया ने (यूआयडीएआय) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सायबराबाद येथे आय टी ग्रीड या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युआयडीएआय ने दिलेल्या फिर्यादीनुसार ही माहिती रिमुव्हेबल स्टोअरेज डिव्हाईस मध्ये आहे. हे आधार कायद्याचे उल्लंघन आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगण या राज्यांची लोकसंख्या ८ कोटी ४० लाख आहे. त्यापैकी ७ कोटी ८० लाख लोकांची माहिती आयटी ग्रीड या कंपनीकडे आहे. तिने आपल्याकडील माहिती तेलगू देशम पक्षाचे सेवा मित्र हे अ‍ॅप तयार करण्यासाठी वापरल्याचा आरोप आहे़

आधार ची ही माहिती सेंट्रल डेटा रिपोझिटरी किंवा स्टेट डेटा हब मधून कंपनीने बेकायदा पद्धतीने ताब्यात घेतल्याचा संशय आहे़ यूआयडीएआय ने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आय टी ग्रीडच्या कार्यालयातून ताब्यात घेतलेल्या हार्ड डिस्कचे विश्लेषण करण्यात आले़ त्यातून मतदारांच्या चोरलेल्या माहितीसह आधार ची माहिती सेवा मित्र अ‍ॅपसाठी वापरल्याचे तपासातून समोर आले आहे. मतदारांचे प्रोफायलिंग, विशिष्ट लक्ष्य ठरवून केलेला प्रचार यासाठी याचा वापर झाल्याचेही समोर आले आहे.