Coronavirus : अक्कलकोट मध्ये ‘कोरोना’चा पहिला बळी, शहरात 5 दिवसांचा जनता ‘कर्फ्यू’

अक्कलकोट : पोलीसनामा ऑनलाइन – अक्कलकोटमधील मधला मारूती परिसरातील एका व्यक्तीचा कोरोनाचा अहवाल तो मृत झाल्यानंतर पॉझिटिव्हि आल्याने आज (शनिवारी) तातडीने सर्व व्यवहार बंद करण्यात आले. तसेच आज एक किलोमीटरपर्यंत प्रतिबंधित झोन तर तीन किलोमीटर बफर झोन जाहीर झाला आहे. यामध्ये शहराचा सर्वच परिसर समाविष्ट होत असल्याने खबरदारी म्हणून प्रशासनाबरोबर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी शासकीय अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेतली. या बैठकीत 24 ते 28 मे असे पाच दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. या दरम्यान दूध आणि औषध वगळता इतर सर्व व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अक्कलकोटमध्ये कोरोनाचा पहिला बळी गेला असून मृत 46 वर्षीय फारशी व्यापाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज (शनिवार) सायंकाळी उशिरा सोलापूर येथेच मृत व्यापाऱ्यावर त्याची पत्नी आणि मुलाच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी या व्यक्तीला सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला होता. नंतर कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हाधिकारी यांनी अक्कलकोट येथे जनता कर्फ्फु लागू केली असून मधला मारुती व सुभाष गल्ली हा भाग कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे, तर संपूर्ण अक्कलकोट शहर बफर झोन जाहीर करण्यात आले आहे.

अक्कलकोट मधील या व्यापाऱ्याचे फरशी व्यवसायानिमित्त मैंदर्गी येथेही येणे-जाणे असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मयत व्यापारी ज्या परिसरात राहत होते तो परिसर आणि व्यापारी ज्या भागात जात होते तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी दिली. त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोना चाचणीसाठी ताब्यात घेण्यात आले असल्याची माहितीही प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी दिली. अक्कलकोट शहरातील मधला मारुती परिसरातील ४६ वर्षीय व्यापाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर ते कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी दिली.

निमोनियाचा त्रास होत असल्याने हे व्यापारी अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी गेले होते. तेथील डॉक्टरांनी एक्स-रे काढण्याचा त्यांना सल्ला दिला. पुढील उपचारासाठी त्यांना सोलापुरात पाठविण्यात आले. सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर त्या व्यापाऱ्याचा 21 मे रोजी मृत्यू झाला. त्यांना गेल्या वर्षी देखील निमोनिया झाल्याचे समजते. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त झाला असून तो अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहितीही प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी दिली.