हरभरा डाळीचे भाव वाढण्याची शक्यता धूसर !

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – दरवर्षीच्या तुलनेत यंदा देशात हरभऱ्याच्या डाळीची लागवड ही 9 लाख हेक्टरपेक्षा जास्त झालेली आहे. राज्यात ग्राहकांकडून हरभरा डाळीची मागणी कमी झालेली आहे. पिकांसाठी वातावरणही अनुकूल आहे. मुंबई बंदरावरही हरभऱ्याची आयात झालेली आहे. त्यामुळं यंदा हरभरा डाळीचे भाव वाढण्याची शक्यता धूसर आहे.

तूर डाळीच्या भावात घसरण झाली आहे. कारण वर्षाच्या अखेरच्या पंधरवाड्यात डाळींना साधारण मागणी होती. उडीग मोगरचे भावही घटलेल्या स्थितीत आहेत. जर 31 डिसेंबर नंतर डाळींवरील आयात शुल्कात वाढ झाली तरच डाळींचे भाव वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकात तुरडाळीच्या उताऱ्यात सद्यस्थितीत कमी असल्याच्या तक्रारी आहेत. जर येत्या काळात नवीन तुरीला हमी भावापेक्षा कमी दर मिळाला तर सरकारकडून खरेदीसाठी प्रारंभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नागपूर किरकोळ व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सांगितलं की, यंदा दालमिल संचालकांकडेही डाळीची टंचाई आहे. चांगल्या गुणवत्तेच्या तुरडाळीला 5500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्यास तुरीची खरेदी लाभदायक ठरणार आहे. यंदा हरभऱ्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. बाजारभावातील हरभऱ्याचे भाव घटले असून वायदा बाजारातही किंमती कमी होऊ लागल्या आहेत.

साठेबाजांनीही दर घसरू लागल्यानं हरभरा डाळीच्या विक्रीत वाढ केली आहे. उडीद, मसूर, मूग डाळ मुंबई बंदरावर आल्यानं या डाळींच्या दरात घसरण झालेली आहे. जर सरकारनं 31 डिसेंबरला मसूरवरील आयात शुल्क वाढवलं तर तर मात्र या डाळीच्या दरात वाढ होऊ शकते अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

जुन्या तांदळाच्या दरात वाढ

जरी मूग मोगरची मागणी कमी असली तरी दीड लाख टन मूग आयात करण्यास सरकारनं परवानगी दिलेली आहे. डाळ आयात न झाल्यास तिचे भाव वाढण्याची शक्यता आहे. परदेशात डाळीला अधिक भाव आहे. धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं नवीन तांदूळ बाजारात येण्याआधीच जुन्या तांदळाच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी क्विंटलमागे तांदळाला 1000 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.