पुणे जिल्हयातील हडसर किल्ल्यावरून पडून तरूणीचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात शिवजयंती उत्साहात साजरी होत असतानाच पुणे जिल्ह्यातील शिवजयंतीला गालबोट लागले आहे. जुन्नरजवळील हडसर किल्ल्यावर गेलेल्या ठाण्यातील तरुणीचा पाय घसरून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना आज (बुधवार) सकाळी साडे अकरा ते बाराच्या दरम्यान घडली. सिद्धी कामठे (वय-20) असे मृत तरुणीचे नाव आहे.

मुंबई-ठाण्यातील एक ग्रुप शिवजयंती साजरी करण्यासाठी जुन्नरजवळ असलेल्या हडसर किल्ल्यावर आला होता. त्यांच्यासोबत ठाण्यातील सिद्धी कामठे देखील हडसर किल्ल्यावर आली होती. सकाळी साडे अकरा ते बाराच्या सुमारास हडसर येथील कुटीची वाट येथे सिद्धीचा पाय घसरला. त्यामुळे ती 450 फूट खोल दरीत पडली. यामध्ये ती गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी आणि पुण्यातील आपत्ती व्यवस्थापनाचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दरीत उतरून सिद्धीला बाहेर काढले. त्यानंतर जुन्नर येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. पोलिसांनी या घटनेची माहिती मृत तरुणीच्या कुटुंबीयांना दिली आहे. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.