पुण्यात चोरटयांनी 4 वेगवेगळे फ्लॅट फोडले, 24 लाखाचा ऐवज ‘लंपास’

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरात घरफोड्याचा धुमाकूळ सुरूच असून, या चोरट्यांनी वेगवेगळे 4 बंद फ्लॅट फोडून तबल 24 लाख रुपयांचा ऐवज पळविला आहे. तत्पूर्वी काही केल्या या घटना पोलिसांना रोखण्यात यश येत नसल्याचे दिसत आहे. पोलीस मागे आणि चोरटे पुढे पळत सर्व सामान्यांच्या पुंजीवर डल्ला मारत आहेत. बिबवेवाडी, सोमवार पेठ, लोहगाव व कात्रज-कोंढवा परिसरात या घटना घडल्या आहेत.

याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात अश्विनी परब (वय ७२) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी या बिबबेवाडी भागातील श्रीरंग सोसायटीत राहतात. ते कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. त्यावेळी फ्लॅटचे कुलुप तोडून चोरट्यांनी कपाटातील ७ लाख ७८ हजार ३४० रुपयांचे दागिने चोरून नेले. परब हे परत आल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. अधिक तपास उपनिरीक्षक डी. बी. काळे करत आहेत.

तर दुसरी घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावर घडली आहे. याबाबत मोहित घुमे (वय ३४, रा. लक्ष्मण निवास, कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी भारती विद्याापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घुमे हे कुटुंबासह बाहेर गावी गेले होते. त्यावेळी त्यांचे घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. तसेच कपाटातील दागिने व रोकड असा ७ लाख ६३ हजारांचा ऐवज नेेला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक महेंद्र पाटील करत आहेत. तसेच लोहगाव भागातील संतनगर परिसरातील माधुरी तांबे (वय ४०) यांचा बंगला चोरट्यांनी फोडला आहे. चोरटे बंगल्यातील खिडकीचे गज कापून आत आले. तर कपाटातील ६ लाख ९१ हजार रुपयांचे दागिने लांबविले. अधिक तपास उपनिरीक्षक ए. आर. गंधले करत आहेत.

त्यासोबतच सोमवार पेठेतील शानरचना सोसायटीतील रहिवासी मधुबाला उदगीर (वय ६९) यांचा फ्लॅट फोडून चोरट्यांनी २ लाख ४७ हजार ३०० रुपयांचा पळविला आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.