Pune : कोंढव्यात ग्राहकांना देण्यासाठी आणलेले दूध रिक्षा चालक पळवतोय, 7 दुकानांमधून गेल्या 6 महिन्यात 546 लिटर ‘गायब’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोंढव्यात ग्राहकांना देण्यासाठी आणलेले दूध रिक्षाचालक पळवत असल्याचा प्रकार समोर आला आहे. 7 दुकानांमधून गेल्या सहा महिन्यात तब्बल 546 लिटर दुधाच्या पिशव्या चोरट्याने पळवल्या आहेत. सीसीटीव्हीवरून आता त्या चोरट्याचा माग काढला जात आहे.

याप्रकरणी वितरक योगेश लोणकर ( वय 33, रा. कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दूध वितरक किराणा मालाच्या दुकानांसमोर ठेवलेल्या क्रेटमध्ये दररोज ठरल्यानुसार दुधाच्या पिशव्या ठेवून जातात. 13 फेब्रुवारी रोजी या क्रेटमधून 102 लिटर दुधाच्या पिशव्या गायब असल्याचे दुकानदारांच्या निदर्शनास आले. त्यानंतर 12 मार्च रोजी एका दुकानातून 116 लिटर दुधाच्या पिशव्या चोरीस गेल्या. त्या पाठोपाठ एक एप्रिलला 124 लिटर व सात एप्रिलला 48 लिटर दुधाच्या पिशव्यांची चोरी झाली. दुकानदारांनी तक्रारी केल्यावर सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले. त्यात एक रिक्षाचालक पहाटे दुधाच्या पिशव्यांची चोरी करत असल्याचे दिसून आले. तो या पिशव्या अन्यत्र विकत असावा अथवा दूध भेसळीच्या रॅकेटमध्ये तो सामील असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.