Lockdown 3.0 : लंडनमधून 65 भारतीयांचे पुण्यात ‘एन्ट्री’ ! महापालिकेकडून खबरदारीचे उपाय

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे परदेशात अडकून पडलेल्यांना माघारी आणण्यासाठी भारताने मोहिम सुरु केली आहे. त्यानुसार खास विमानाने रविवारी लंडनहून 65 भारतीयाचे पुण्यात आगमन झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्यावतीने खबरदारी घेण्यात आली असून त्यांना हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना परत पाठवण्याबरोबरच परदेशातील भारतीयांना परत आणण्याचे काम सुरू झाले आहे. विविध देशातील भारतीय नागरिकांना आणण्यासाठी विशेष विमानं सोडण्यात आली आहेत. रविवारी पुण्यात लंडनहून 65 भारतीय नागरिक दाखल झाले. पुणे महापालिकेच्यावतीने त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बालेवाडी येथील हॉटेलमध्ये त्यांना ठेवण्यात आले आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

परदेशातून आलेल्या नागरिकांची व्यवस्था करण्यासाठी कार्यकारी अभियंते युवराज देशमुख यांची नियुक्ती केली आहे. परदेशातून आलेल्या भारतीयांना 14 दिवस हॉटेलमध्ये क्वारंटाईन केले जाणार असून, हॉटेलचा खर्च त्यांनाच करावा लागणार आहे. पुण्यात आल्यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी करून त्यांच्यावर 14 देखरेख ठेवण्याचे काम महापालिका करणार आहे. परदेशातून येणार्‍या 200 लोकांना सुविधा देण्यासाठी महापालिका सज्ज आहे. शहरातील विविध भागात असलेल्या तारांकित हॉटेलमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. पुण्यात परदेशातून किती लोक परत येणार आहेत, याचा निश्चित आकडा नाही. मात्र, गरजेनुसार व्यवस्थेमध्ये वाढही केली जाणार आहे.