Pune : बार्शीवरून पुण्यात कारमध्ये गांजा घेवून येणार्‍यास अटक, 24 लाखाचा माल जप्त

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – बार्शीवरून कारमध्ये गांजा घेऊन पुण्यात येत असलेल्या एकाला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. त्याच्याकडून तबल 24 लाख रुपयांचा 150 किलो गांजा पकडला आहे. त्याने हा गांजा कोठून आणला आणि तो कोणाला विक्री करण्यास जात होता याचा तपास आता केला जात आहे.

सचिन कुमार मिरगणे (वय 32, रा. सुभाष नगर, चौदा नं शाळे पाठीमागे बार्शी, ता. बार्शी जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात सुरू असणारे वैध धंदे मोडुन काढण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यात सुरू असणारे अवैध धंद्यावर कारवाई करत आहे. यादरम्यान माहिती घेत असताना भिगवण पोलिस स्टेशन हद्दीत एक टाटा कंपनीची झेस्ट कारमध्ये (क्रमांक एम.एच. १३.सी एस १६२६) अवैध रित्या गांजा वाहतूक केेली जात असून, तो सोलापूर- पुणे मार्गावरून येणार आहे. यानुसार सोलापूर पुणे महामार्गावर अकोला फाट्या जवळ सदर पथकाने सापळा रचून कार चालकाला पकडले. तपासणी केली असता गाडीत 3 खाकी रंगाच्या मोठ्या गोण्या मिळून आल्या. तसेच डिक्कीत खाकी रंगाच्या २ मोठ्या गोण्या मिळून आल्या. त्यात गांज्यचे पाकीट मिळून आले.

त्याच्याकडून 24 लाख रुपयांचा 150 किलो गांजा आणि कार असा एकूण 28 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज मिळाला आहे. तेलंगणा येथे त्याच्यावर 2013 साली गुंगीकारक औषध द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९५८चे कलम ८(क),२०(क) नुसार गुन्हा दाखल आहे. आता तो हा गांजा कोणाला देणार होता, याची माहिती घेतली जात आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक पद्माकर घनवट, उपनिरीक्षक शिवाजी ननवरे कर्मचारी रविराज कोकरे, अनिल काळे, अभिजित एकशिंगे, विजय कांचन, धिरज जाधव यांच्या पथकाने केली.