जिल्हा प्रशासनाचे आदेश धुडकावणार्‍या पुण्यातील 154 दुकानांवर कारवाई

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक दुकाने सोडून सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश दिले असताना जिल्हा प्रशासनाचे आदेश धुडकावून शुक्रवारी दुकाने उघडणाऱ्यावर कारवाई करण्यात आली. दोन दिवसात पोलिसांनी 154 दुकानांवर कारवाई केली आहे.

जगभरासह राज्यात कोरोना आजाराने थैमान घातले आहे. पुण्यातही कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनांकडून शाळा, महाविद्यालये, खासगी कार्यक्रम रद्द केले आहेत. तर दुसरा टप्पा म्हणून गर्दी टाळण्यासोबतच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून इतर दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तर जमावबंदीचा आदेश लागू केले आहेत. सर्व खासगी कंपन्यांना वर्क टू होम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जिल्हा प्रशासनाने हॉटेल, दुकाने तसेच मॉलसह जीवनावश्यक बाबी सोडून इतर सर्व दुकाने ३१ मार्च पर्यत बंद करण्याचे आदेश दिले होते. तरीही शहरात गेल्या दोन दिवसांपासून अनेक दुकाने उघडण्यात येत आहेत. सुरवातीला पोलिसांनी ती दुकाने बंद करण्यास सांगितली. मात्र, तरीही पुन्हा दुकाने उघडली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांनी दुकानदारांवर भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार कारवाई केली आहे. शहरात शुक्रवारी ७६ दुकानदारांवर ही कारवाई करण्यात आली. तर गुरूवारी ७८ दुकानदारावर कारवाई करण्यात आली होती, असे सांगण्यात आले आहे.