Pune : महत्वपूर्ण बैठकीनंतर अजित पवारांचे पुण्यातील Lockdown संदर्भात मोठं विधान, म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज (शुक्रवार) पुण्यात बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार यांनी कोरोना स्थितीचा आढावा घेतला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार पुणे शहरात संपूर्ण लॉकडाऊन करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी पुण्यात संपूर्ण लॉकडाऊन होणार नसल्याचे स्पष्ट केलं.

बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती देताना अजित पवार म्हणाले, पुण्यात आता आहे तशा पद्धतीनेच नियम सुरु ठेवावेत, हवं तर आणखी कडक निर्बंध करावेत. जे लोक अनावश्यकपणे बाहेर फिरत आहेत, त्यांना रोखावं, अशी चर्चा या बैठकीत झाली, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. पुण्यातील कोरोनाची स्थिती पाहून मुंबई उच्च न्यायालायने पुण्यात लॉकडाऊन करण्याचा विचार करावा, अशा सूचना दिल्या होत्या. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीत अजित पवार लॉकडाऊन संदर्भात कोणता निर्णय घेणार याकडे पुणेकरांचे लक्ष लागले होते. मात्र, सध्या तरी शासनाने संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेणं टाळलं आहे.

अजित पवार म्हणाले, ग्रामीण भागात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु शहरात रुग्णसंख्या वाढत नाही. काही प्रमाणात ही संख्या कमी झाली आहे. बैठकीत आमदार, खासदारांनी काही सूचना केल्या. दुसऱ्या टप्प्यात रेमडेसिवीर, ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटरसाठी जी धावपळ करावी लागली ती तिसऱ्या लाटेत करायला लागू नये, यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवारांच्या प्रतिक्रियेतील ठळक मुद्दे

– लसींच्या पुरवठ्याबाबत मी अदर पुनावाला यांना फोन केला होता. पण ते अद्याप परदेशात असल्याचे सांगण्यात आले.
– पुनावाला हे पुढील दहा ते बारा दिवसात भारतात परतणार आहेत. यामुळे त्यांचा तिकडचाही संपर्क क्रमांक मिळवण्याचा प्रयत्न आहे.
– ससूनसह काही ठिकाणी ऑक्सिजन प्लँट सुरु झाले आहेत
– लसींचा पुरवठा कमी असल्याने अडचणी येत आहेत.