Pune : बिबवेवाडीत बांधकाम व्यावसायिकाच्या घरात भरदिवसा चोरीचा ‘थरार’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात घरफोड्याचा धुमाकूळ सुरू असतानाच बिबवेवाडीत बांधकाम व्यावसायिकाच्या घरात भरदिवसा चोरीचा थरार घडला आहे. बंद घरात चोरी केली, पण पैशांची बॅग घेऊन जात असताना ती बॅग शेजारच्या इमारतीत पडली अन् तिथेच गेम पालटला. चोरट्याचे धाडस इतके की, तो त्या शेजारच्या घरात शिरला अन् माझी बॅग पडली असे म्हणून बॅग मागू लागला. पण त्यांनी ती दिली नाही; त्याने एकाला मारहाण करून बॅग चोरून नेली.

त्या चोरट्याला शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांनी हटकलेदेखील; पण वादात त्याने एकाला मारहाण करून 6 लाख 70 हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला आहे. त्यामुळे चोरटे आता भरदिवसा घरफोड्या करू लागले आहेतच, पण ते मध्ये कोणी आल्यास त्यांच्यावर हल्ला करून चोऱ्या करत असल्याचे दिसून येत आहे.

याप्रकरणी तेजस प्रवीण दुगड (29) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .फिर्यादी तेजस आणि त्याच्या भावाचा बंगला शेजारी शेजारी आहे. तेजस व त्यांचे कुटुंबीय कामानिमित्त बाहेर गेले होते. यावेळी त्यांच्या घरामध्ये एक चोरटा घुसला होता. त्याने वरच्या मजल्यावरील कपाटाच्या ड्रॉवरमधून 6 लाख 70 हजारांची रोकड चोरली. ही रोकड त्याने एका बॅगेत भरली. बॅगेसकट खाली उतरता येत नसल्याने त्याने ती बॅग वरून खाली टाकली. मात्र, ती नेमकी त्याच्या भावाच्या घराच्या व्हरांड्यात पडली. ही बॅग त्याच्या भावाच्या घरातील आचारी देवजी सोळंकी यांना सापडली. त्यांनी ती तातडीने तेजस यांची वहिणी मोनल दुगड यांना दिली. तीने ती घरामध्ये नेऊन ठेवली. दरम्यान, बॅग खाली टाकणारा चोरटा त्यांच्या घरामध्ये आला. त्याने देवजी सोळंकी यांना माझ्या आत्याची बॅग तुमच्या घरात पडली आहे. ती मला द्या अशी मागणी केली. देवजीने ही बाब मोनल यांना सांगितली. त्या बॅग घेऊन घराबाहेर आल्या. मात्र, त्यांनी चोरट्याला बॅग हवी असेल तर तुझी ओळख सांग खात्री पटल्यावरच आम्ही बॅग देऊ असे सांगितले. यामुळे चोरट्याने त्यांच्या हातातील बॅग हिसकावत पळ काढला. मात्र, त्याला मोनल यांचा चालक राऊत यांनी अडवले. चोरट्याने राऊतला हाताने मारहाण करत घराबाहेर पळ काढला. तेथे त्याचा एक साथीदार दुचाकीवर उभा होता. त्याच्या दुचाकीवरून त्याने पळ काढला. चोरी करणारे आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले असून, त्यांच्या शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.