Pune : अतिक्रमणच्या कर्मचाऱ्याने भाजी विक्रेत्या महिलेच्या डोक्यात घातला स्पीकर, गंभीर जखमी

पुणे : महापालिकेच्या हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भाजीविक्रेत्या महिलेच्या डोक्यात स्पीकर घातल्याने गंभीर दुखापत झाली. तिला अस्वस्थ वाटू लागल्याने तिने हडपसर पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी तिच्या मैत्रिणीसोबत ससून रुग्णालयामध्ये उपाचरासाठी पाठविले. हा प्रकार आज (मंगळवार, दि. 11 मे) सकाळी 9 च्या सुमारास घडला.
रक्मिणी संतोष धोत्रे (वय 27, रा. वेताळबाबा वसाहत, हडपसर) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. या महिलने हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते. हडपसर-गाडीतळ ते मंत्री मार्केट दरम्यान भाजीविक्रेते दररोज सकाळी 8 ते 10 दरम्यान असतात. आज मंगळवारी (दि. 11 मे) सकाळी 9 च्या सुमारास अतिक्रमण विभागाची गाडी आली, त्यामुळे धोत्रे यांनी माल गोळा करून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांनी तिच्या हातातील माल हिसकावला. मात्र, त्याला तिने विरोध करताच अतिक्रमणच्या कर्मचाऱ्यांनी स्पीकर तिच्या डोक्यात घातला, तो उजव्या डोळ्याच्या वर लागल्याने रक्त वाहू लागले. तिने हातातील माल सोडून मार लागलेल्या ठिकाणी हाताने दाबून धरत पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी तिला तिच्या मैत्रिणीसोबत ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठविले.

कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवार ते शुक्रवारी सकाळी 7 ते 10 च्या दरम्यान दूध, भाजीपाला, किरणामाल विक्रेत्यांना परवानगी दिली आहे. तरीसुद्धा महापालिकेच्या हडपसर विभागातील अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांनी 9 वाजता का कारवाई केली, अनधिकृत भाजीविक्रेत्यांवर कारवाई करताना इतर भाजीविक्रेते दिसले नाहीत का, महिलेसमवेत पुरुष कर्मचाऱ्यांनी झटापट का केली, हडपसर क्षेत्रीय कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पदपथ दुकानदारांनी व्यापले आहेत, तेथून दररोज अधिकारी आणि कर्मचारी ये-जा करतात, ते त्यांना दिसत नाहीत का, अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचे अधिकारी दिले आहेत का, अशा एक ना अनेक तक्रारी उपस्थित नागरिकांनी केल्या.

अतिक्रमण विभागाने अनधिकृत व्यावसायिकांवर जरूर कारवाई केली पाहिजे, याबाबत कोणाचेही दुमत असणार नाही. मात्र, हडपसर-गाडीतळ ते मंत्री मार्केट दरम्यान मागिल अनेक वर्षांपासून भाजीविक्रेते बसतात. याविषयी स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रार केली आहे. मात्र, अतिक्रमण विभाग त्याविषयी मूग गिळून गप्प का आहे, त्यांचे पुनर्वसन का केले जात नाही, अतिक्रमण विभागाला मारहाण करण्यापर्यंत मजल का गाठावी लागले, अशी विचारणा भाजीपाला विक्रेते करीत आहेत.

हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण निरीक्षक गणेश तारू म्हणाले की, अनधिकृत भाजीविक्रेत्यांवर कारवाई सुरू होते. त्यावेळी त्या महिलेने विरोध करत कर्मचाऱ्यांबरोबर झटापट केली. त्या महिलेने ओढाताण केली, त्यामध्ये ती पडली आणि तिच्या डोक्याला मार लागला. अनधिकृत भाजीविक्रेते अर्ध्या रस्ता अडवून ठेवतात, त्यामुळे अपघातसदृशस्थिती निर्माण होते, त्यामुळे कारवाई केली जाते, असे त्यांनी सांगितले.