Pune : ‘तू आमच्याकडे नेहमी खुन्नसने का पाहतो, तुला लय मस्ती आली आहे का?’ गंजपेठेत टोळक्याकडून राडा, युवकाच्या खुनाचा प्रयत्न अन् वाहनांची तोडफोड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मध्यवस्तीत कोयतेधारी टोळक्याने दहशत निर्माण करत एका तरुणावर कोयत्याने वार केल्यानंतर रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. शहरातील टोळक्यांचे राडे व त्यातून पसरत असलेली दहशत कमी होत नसल्याचे दिसत आहे. दुर्गेश अवघडे, तुषार गणेश नेटके, शशिकांत चंद्रकांत भोंडे आणि त्यांच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रेम अमर पाटोळे (वय 20) यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सवर्जन गंज पेठेत राहणारे आहेत. फिर्यादी हे मंगळवारी रात्री जेवणकरून आई आणि नातेवाइकांसह घराबाहेर गप्पा मारत थांबले होते. यावेळी आरोपीनी मोठमोठ्याने शिवीगाळ करत आले. त्यांच्या हातात शस्त्र होते. फिर्यादी यांनी त्यांना कोणाला शिव्या देता असे विचारले असता आरोपींनी “तू आमच्याकडे नेहमी खुन्नसने का पाहतो, तुला लय मस्ती आली आहे का” असे म्हणत गोंधळ घालत लाथाबुक्क्याने मारहाण केली. तर दुर्गेश अवघडे याने त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केला. यावेळी या ठिकाणी गोंधळ झाल्याने आजूबाजूची लोकं जमली होती. त्यानंतर आरोपीने तिथून जाण्यास निघाले असता त्यांनी तुफान राडा घालत रस्त्याच्या कडेला लावलेल्या वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत पसरली. अधिक तपास खडक पोलीस करत आहेत.