पुण्यात तडीपार गुन्हेगाराकडून फिल्मीस्टाईल कोयत्याने सपासप वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातील स्ट्रीट क्राईम काही केल्या कमी होत नसून, तडीपार केल्याची भरमासाठ आकडेवारी देणार्‍या पोलिसांच्या नाकावर टिच्चून तडीपार गुंड शहरात येऊन दहशत माजवत आहेत. कात्रज तलावाजवळ तडीपार गुंडाने साथीदारांच्या मदतीने फिल्मी स्टाईलने एका तरुणाचा जवळपास एक किलोमीटर पाठलाग करून कोयत्याने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याप्रकरणी अमित रामदास निंबाळकर (वय 25, रा. गुजर निंबाळकरवाडी) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सागर माने, सुनील राठोड आणि प्रतिक नलावडे, सुरेश मुस्तारी यांच्यावर खूनाच्या प्रयत्नासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील राठोड हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. सध्या तो उत्तमनगर पोलीसांकडून शहरातून दोन वर्षांसाठी तडीपार आहे. त्याच्यावर वाहन तोडफोड, आर्म्स अ‍ॅक्टसह इतर गुन्हे दाखल आहेत. तर, प्रतिक नलावडे याच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. दरम्यान, सागर माने व अमित यांच्यात यापुर्वी भांडण झाले होते. त्यावेळी माने याला बेदम मारहाण करण्यात आली होती. याचा राग आरोपींच्या मनात होता. त्याचा बदला घेण्यासाठी आरोपींनी कट रचला.

त्यानंतर सोमवारी भल्या सकाळी फिर्यादी अमित हा कात्रज येथील तलावाजळ आला असता त्याठिकाणी आरोपी आले. त्यामुळे अमित याच्यासोबत वाद घालण्यास सुरूवात केली. त्यामुळे अमित त्यांच्या तावडीतून पळून जाऊ लागला. मात्र, आरोपींनी फिल्मी स्टाईलने जवळपास एक किलोमिटर त्याचा पाठलाग करून त्याला राजस सोसायटी चौकात गाठले. तसेच, त्याच्यावर कोयत्याने तसेच लाकडी दांडूक्याने सपासप वारकरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. भल्या सकाळी झालेल्या या थरारामुळे परिसरात चांगलीच दहशत माजली होती. अमित रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता. नागरिकांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –