Pune : बाणेरचा कचरा प्रक्रिया प्रकल्प : कोथरूडचे आजी आमदार नगरसेवकांसमवेत तर माजी आमदार नागरिकांसमवेत आयुक्तांच्या भेटीला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बाणेर येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पावरून कोथरूडच्या भाजपच्या आजी – माजी आमदारांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. विशेष एकाच दिवशी काही तासांच्या अंतराने आयुक्तांची भेट घेताना आजी आमदारांसोबत पालिकेतील ‘पदाधिकारी व नगरसेवक’ होते तर माजी आमदारांसोबत ‘नागरिक’ होते. भाजपच्या या अंतर्गत स्पर्धेची चर्चा मात्र पालिका वर्तुळात चांगलीच रंगली होती.

महापालिकेच्यावतीने काही वर्षांपूर्वी बाणेर येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. हा प्रकल्प बंद करावा अशी मागणी कोथरूडच्या तत्कालीन आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी केली होती. तसेच यावर्षी जानेवारीच्या सुमारास विद्यमान आमदार व भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही हीच मागणी आयुक्तांना भेटून केली होती.

नुकतेच एनजीटी ने एका याचिकेवर निर्णय हा प्रकल्प बिडीपीमध्ये असल्याचा ठपका ठेवत चार महिन्यांत बंद करण्याचा आदेश दिला आहे.

* या पार्श्वभूमीवर कोथरूडमधील विविध प्रश्नांसह कचरा प्रक्रिया प्रकल्पामध्ये सुधारणा करा अथवा प्रकल्प बंद करा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळी आयुक्तांची भेट घेऊन केली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह सगळे पदाधिकारी आणि कोथरूडमधील भाजपचे सगळे नगरसेवक उपस्थित होते.

* दरम्यान, दुपारी चारच्या सुमारास माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी काही नागरिकांसमवेत आयुक्तांची भेट घेतली. कचरा प्रक्रिया प्रकल्पाविरोधात एनजीटीने दिलेल्या निकालाविरोधात पालिकेने न्यायालयात अपिल करू नये, अशी मागणी केली. तसेच अन्य दोन प्रश्नांबाबत चर्चाही केली. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

* सहा वर्षांपूर्वी कोथरूड मतदारसंघातून एक लाखांचे मताधिक्य घेऊन निवडून आलेल्या प्रा. मेधा कुलकर्णी यांना यंदा भाजपने उमेदवारी नाकारली. त्याऐवजी चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपमध्ये आणि कोथरूडकरानी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळेच बालेकिल्यातून निवडून येण्यासाठी पाटील यांना खूप कष्ट घ्यावे लागले होते. प्रा. कुलकर्णी यांच्या नाराजीचा फटका पाटील यांना बसल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही महिन्यांपासून प्रा. कुलकर्णी पुन्हा ऍक्टिव्ह झाल्या असून नागरी प्रश्न हाताळण्यासाठी त्या नागरिकांसोबतच फिल्डवर जात असल्याचे पाहायला मिळत असल्याने कोथरूड भाजपमध्ये सगळं अलबेल नाही याला पुष्टी मिळू लागली आहे.