पुण्यात पुन्हा Lockdown, अजित पवारांच्या आदेशाला व्यापारी संघाचा विरोध

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे शहर आणि परिसरामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले आहेत. अजित पवार यांच्या आदेशानुसार या दोन्ही शहरांमध्ये 13 जुलै ते 23 जुलै या कालावधीत कडक लॉकडाऊन असणार आहे. यासंदर्भात अजित पवार यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठकीत चर्चा केली.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असला तरी त्याला पुणे शहर व्यापारी संघाने विरोध केला आहे. पुणे शहरात परत लॉकडाऊन झाला तर उद्रेक होईल, असे व्यापारी संघाचे अध्यक्ष फत्तेचंद राका यांनी म्हटले आहे. सातही दिवस दुकाने उघडी ठेवावीत. सकाळी 9 ते संध्याकाळी 7 अशी वेळ असावी, अशा मागण्या व्यापारी संघानं केल्या आहेत. व्यापारी संघात सुमारे 40 हजार दुकानदार सदस्य आहेत. आता व्यापारी संघाच्या विरोधानंतर प्रशासन कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. एकट्या पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून एक हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. पुणे जिल्ह्याची कोरोना बाधित रुग्णांची संख्या 35 हजाराच्या वर गेली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना बाधितांची संख्या 6 हजारापेक्षा अधिक आहे. त्यामुळे पुणे शहरात अत्यंत कडक लॉकडाऊन करण्यात येत आहे. 13 जुलै म्हणजे सोमवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. यामध्ये दूध, औषधांचा समावेश आहे.