खळबळजनक ! कात्रज प्राणिसंग्रहालयात भटक्या कुत्र्यांनी केली 4 काळवीटांची ‘शिकार’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राजीव गांधी प्राणिसंग्रहालायत भटक्या कुत्र्यांनी प्रवेश करून, काळविटांवर केलेल्या हल्ल्यात एका मदीसह चार काळविटांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.6) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकारानंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी तातडीने प्राणिसंग्रहालयात धाव घेतली, महापालिकेच्या व प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.

प्राणिसंग्रहालयात सकाळी कर्मचारी फिरत असताना त्यांना चार काळवीट मृतावस्थेत आढळून आली. त्यानंतर आजुबाजूला शोध घेतल्यावर कुत्री असल्याचे दिसले. कर्मचाऱ्यांनी लगेच त्या कुत्र्यांना पकडले. पाच पैकी चार कुत्र्यांना पकडण्यात यश आले. पण एक कुत्रा इतरत्र पळून गेला. सीसीटीव्हीच्या मदतीने या कुत्र्याचा शोध घेण्यात येत आहे. जर हा कुत्रा हरणांच्या खंदकात गेला, तर अजून मोठा अनर्थ होऊ शकतो, त्यामुळे त्याला पकडणे गरजेचे असल्याने त्याचा शोध घेतला जात आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी पाच कुत्र्यांनी काळविटांच्या खंदकामध्ये प्रवेश करुन, काळविटांवर हल्ला केला. मृत काळविटापैकी दोन काळविटांवर कुत्र्यांच्या हल्ल्याचे व्रण आहेत. मादीवर मोठा हल्ला झाला असून, चौथ्या काळविटाचा भेदरुन मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली. या ठिकाणी असलेल्या तलावातील जलपर्णी काढण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्याने तातडीने प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर प्राणिसंग्रहालयाचे चार कर्मचारी काळविटांच्या खंदकामध्ये गेले. त्यावेळी त्यांना चार कुत्री सापडली. या कुत्र्यांना काळविटांच्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहे. एक कुत्रा तेथून गायब झाला.

या ठिकाणी जुलैपासून ड्रेनेज लाईनचे काम सुरु आहे. अद्याप ते पूर्ण झालेले नाही. अतिरिक्त आयुक्त खेमनार यांनी संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी करुन ही कामे वेळेत का पूर्ण झाली नाही, याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यासर्व घटनेमध्ये निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिल्याचे सुत्रांनी सांगितले.

प्राणीसंग्रहालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातून काही वर्षापूर्वी मोर चोरीला गेले होते. दोन वर्षापूर्वी पिंजरा तोडून घुबडाची चोरी झाली होती. त्यानंतर माकड आणि नीलगायींच्या खंदकात शिरुन चोरांनी चंदनाची झाडे चोरून नेली होती. संग्रहालयामध्ये सातत्याने अशा प्रकारचे गैरप्रकार घडत आहेत. आता भटक्या कुत्र्यांनी काळविटांच्या खंदकात शिरून हल्ला केल्याने प्राणि संग्रहालयाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.