ईस्कॉन मंदिराजवळ कारच्या काचा फोडून लॅपटॉप चोरीला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातील चोरीच्या घटना आणि लुटमार थांबत नसून, आता चोरट्यांनी आपला मोर्चा पार्किंग केलेल्या कारकडे वळविला असून, ईस्कॉन मंदिराजवळ पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून तीन लॅपटॉप चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिनेश चंदवाणी (वय 40, रा. कोरेगांव पार्क) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कोरेगांव पार्क परिसरात राहण्यास आहेत. दरम्यान, त्यांनी त्यांची कार ईस्कॉन मंदिराजवळ पार्क केली होती. तर, त्यांच्यासोबतच नितीन जाधव आणि मंगेश गायकवाड यांनीही त्यांच्या कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर वेस्टर्न पुतळ्याकडे जाणार्‍या महात्मा गांधी रोडवर पार्क केल्या होत्या. यादरम्यान, चोरट्यांनी तीनही कारच्या काचा फोडून त्यातील 60 हजार रूपयांचे 3 लॅपटॉप चोरून नेले आहेत. हा सर्व प्रकार 13 ते 23 या कालवधीत घडला आहे. अधिक तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.

पीएमपी प्रवासात पुन्हा चोरी… 
पीएमपीएल मधील प्रवासादरम्यान महिलांकडील दागिने चोरीचे प्रकार कायम असून, महिलेच्या पर्समधील 43 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या बोपोडी परिसरात राहण्यास आहेत. कामानिमित्त स्वारगेट परिसरात आल्या होत्या. त्यांना एफसी रोडला जायचे होते. त्यामुळे त्यांनी स्वारगेटवरून पीएमपी बस पकडली. त्यावेळी बसमध्ये गर्दी होती. बस येथील वाडेश्वर बस स्टॉपला थांबल्यानंतर फिर्यादी खाली उतरल्या. त्यावेळी त्यांना पर्समधील दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलीसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. अधिक तपास डेक्कन पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like