कार खरेदी-विक्री एजंटनेच परस्पर गाडी विकून केली फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जुन्या गाड्यांची खरेदी-विक्री करणार्‍या एजंटनेच एकाची सव्वा लाखाला कार विक्री करून देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. टीटी फॉर्मवर बनावट स्वाक्षर्‍याकरून ती कार नाशिकला विक्री केल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी एजंट जमील फकीर महम्मंद शेख (वय 47, रा. मोशी) याला पोलीसांनी अटक केली आहे. याबाबत भारत राऊत (वय 25) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भारत हे मिळेल ते काम करतात. त्यांच्याकडे स्वतची कार होती. त्यांना ती विक्री करायची होती. तर, आरोपी याचे मोशी परिसरात जुन्या कार विक्री व खरेदीचा व्यावसाय आहे. भारत याने त्याची कार विक्रीसाठी आरोपीकडे नेली.

त्यावेळी त्याने ही कार 1 लाख 20 हजार रुपयांना विक्रीकरून देतो, असे सांगितले. तसेच, त्यांची कार ठेवून घेतली. त्यानंतर फिर्यादींची परवाणगी न घेताच आरोपीने आरटीओच्या फॉर्म 28 आणि 29 वर खोट्या स्वाक्षर्‍याकरून फिर्यादींची कार नाशिकमधील एका व्यक्तीला विक्री केली. तसेच, फिर्यादींची फसवणूक केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर फिर्यादींनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखलकरून जमील याला अटक केली. अधिक तपास उपनिरीक्षक सातपुते हे करत आहेत.