Pune : प्लेसमेंट कंपनीतून बोलत असल्याचे सांगून दिलं नोकरीचं आमिष, 43 वर्षीय महिलेला घातला 8.60 लाखांना गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्लेसमेंट कंपनीतून बोलत असल्याचे सांगत एका चांगल्या ठिकाणी नोकरी लावण्याच्या बहाण्याने महिलेला तबल 8 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. मे ते सप्टेंबर 2020 या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी 43 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर गुन्हेगारांवर आयटी ऍक्ट व फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या मगरपट्टा सिटी परिसरात राहण्यास आहेत. त्या खासगी ठिकाणी नोकरी करतात. दरम्यान त्या चांगली नोकरी शोधत होत्या. यावेळी त्यांना अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्याने रिकृपमेंट एजन्सीकडून बोलत असल्याचे सांगितले. तसदच तुम्हाला असेंच्युर या चांगल्या ठिकाणी नोकरी लावून देतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. तर वेगवेगळ्या प्रोसेसिंग फी म्हणून त्यांच्याकडून 11 लाख 99 हजार 611 रुपये बँक खात्यावर भरण्यास भाग पाडले. पैसे भरून देखील त्यांना नोकरी लागली नाही.

यावेळी त्यांनी आरोपींशी संपर्क साधला. त्यावेळी आरोपींनी त्यांना 11 लाख 99 हजारांपैकी 3 लाख 39 हजार रुपये परत केले. मात्र उर्वरित 8 लाख 60 हजार रुपये परत न करता त्यांची फसवणूक केली. हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. या तक्रारीची प्राथमिक चौकशी करून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.