पुणे : केमिकल कंपनीमध्ये विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू

पुणे /दौंड : पोलीसनामा ऑनलाइन – दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील सनराईज फाईन केमिकल्स कंपनीत शुक्रवारी (ता.१४) इलेक्ट्रिक विजेचा धक्का बसल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. संदीप कुमार चर्मकार (वय, २४) असे त्या मृत कामगाराचे नाव असून तो मुळचा मध्यप्रदेशचा असणारा सध्या कुरकुंभ येथे वास्तव्यास आहे. संबंधित माहिती तेथील नारेंद्र रामगरीब वर्मा यांनी दौड पोलीस स्टेशनमध्ये दिलीय. तर या घटनेवरून कामगारांमध्ये खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, संदीप चर्मकार हे नारेंद्र वर्मा सोबत हेल्पर म्हणून काम करत होते. आणखी एक हेल्पर म्हणून अरविंद वर्मा होते. तर कंपनीतील प्रोसेसिंग रूममध्ये कॉस्‍टीक केमिकलचे बॅचचे काम सुरू होते. तेव्हा केमिकल स्क्रू कनव्होअर मशिनद्वारे रिअ‍ॅक्टरमध्ये टाकण्यासाठी अरविंद वर्मा आणि संदिप कुमार चर्मकार हे स्क्रू कनव्होअर मशीन चालू करण्यासाठी रिअ‍ॅक्टर जवळ घेण्याची तयारी करीत होते. स्क्रू कनव्होअर ओढताना मशीनचा स्टीलचा पाईप टेम्प्रेचर कंट्रोलचे इलेक्ट्रिक लाईटच्या तारेला धडकून वायर तुटली. त्यावेळी इलेक्ट्रिक कंरट स्क्रू कनव्होअर मशीनला आल्याने संदिप चर्मकार याला शॉक लागला आणि तो मशीनला चिटकून राहिला.

या दरम्यान, पुढे प्रोसेसिंग खोलीतील विद्युत प्रवाह ऑफ केल्यानंतर संदीप हा जमिनीवर कोसळला. तसेच, त्याला टू व्हीलरने कुरकुंभ येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. मात्र, त्याला दौंड मधील हॉस्पिटलला घेऊन जाण्यास सांगितले. तसेच त्याला दौंडच्या उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, सकाळी ७ च्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.