Pune Congress | पुणे शहर कॉंग्रेसमधील ‘गटबाजीचा’ आजार बळावत चाललाय?

निवडणुकांमध्ये कॉंग्रेससह ‘महाविकास आघाडीला’ धक्का बसण्याची चिन्हे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Congress | नुकतेच झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपाचा (BJP) बालेकिल्ला हिसकावून घेत महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) ताकद दाखविणार्‍या शहर कॉंग्रेसमध्ये सध्या बदललेल्या राजकिय परिस्थितीमध्ये देखिल ‘दुही’ दिसून येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) नुकतेच उभी फूट पडल्यानंतरही शहर कॉंग्रेसमध्ये दोन स्वतंत्र गट कार्यरत असल्याने शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी कॉंग्रेसपाठोपाठच आता कॉंग्रेसही ‘फुटणार’? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. (Pune Congress)

 

मागील वर्षभरामध्ये राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. राज्य स्तरावरील प्रमुख पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. या दोन्ही पक्षांचे एक-एक गट भाजपसोबत राज्यात सत्तेवर आले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर भाजपच्या विरोधात ताकद निर्माण करू शकणार्‍या कॉंग्रेसमध्येच सवता सुभा असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रामुख्याने जिल्ह्यात दोन आमदार असलेल्या कॉंग्रेसमध्ये पुणे शहरातील विधानसभेच्या आठ मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणार्‍या शहर कॉंग्रेसमध्ये दुफळी दिसून येत आहे. (Pune Congress)

 

शहर कॉंग्रेसचे प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) आणि पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी (Congress Leader Mohan Joshi) यांच्या नेतृत्वाखालील गटामध्ये शीतयुद्ध सुरू आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाकडून आयोजित आंदोलने आणि बैठकांना जोशी यांच्या गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित नसतात. तर दुसरीकडे मोहन जोशी हे देखिल त्यांच्या गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना घेउन स्वतंत्र आंदोलने आणि विविध प्रश्‍नांवर आवाज उठवत असतात. हे दृष्य मागील काही महिन्यांपासून पदोपदी दिसून येत असल्याने सर्वसामान्य कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये देखिल नाराजीचे वातावरण आहे. पक्षाच्या बैठकीमध्ये कार्यकर्ते ही खंत बोलून दाखवत आहेत. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये होणार्‍या निवडणुकांमध्ये पक्षांतर्गत विरोधकांना धडा शिकवण्याचा नादात शहर कॉंग्रेसची अवस्था ‘तेलही गेले अन् तुपही’ अशीच होण्याची चिन्हे सध्यातरी दिसत आहेत.

 

कसबा पोटनिवडणुकीमध्ये पुणे शहरात ठाण मांडून बसणारे पक्षाचे प्रदेशअध्यक्ष नाना पटोले
(Nana Patole) तसेच प्रमुख नेते निवडणुकीनंतर अभावानेच पुण्यात पक्ष संघटनेच्या कामासाठी येत आहेत.
माजी खासदार सुरेश कलमाडी (Suresh Kalmadi) यांच्यानंतर शहरात सर्वांना
किंबहुना बहुतांश पदाधिकार्‍यांना एकत्र ठेवू शकेल, असे नेतृत्वच तयार होउ शकलेले नाही.
विशेष असे की प्रदेशअध्यक्ष पद भुषविणार्‍या मंडळींनी देखिल येथील आपल्या समर्थकांचीच पाठराखण केल्याचे पाहायला मिळत आहे. देश पातळीवरील प्रमुख नेते केंद्रांतील सत्तेला प्रखर विरोध करत असताना शहर कॉंग्रेस मात्र केवळ ‘आंदोलनं’ आणि ‘निवेदनांच्या’ पलिकडे फारसे पाहात नाही, हे जाणवत असूनही त्याकडे दुर्लक्ष करत असल्याची खंत सर्वसामान्य कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

 

Web Title : Pune Congress | Pune city is strengthening the disease of ‘groupism’ in Congress?

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा