Coronavirus in Pune : पुण्यात ‘कोरोना’चा कहर कायम! पुण्यात गेल्या 24 तासात 4653 नवीन रुग्ण, 46 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   मागील काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुणे शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. परंतु रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाने पुणे शहरात सात दिवसांचा मिनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये 4 हजार 653 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर 46 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पुणे शहरात कोरोनाचा कहर सुरुच असल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

पुणे शहरामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना मृतांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. पुणे शहरात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 78 हजार 099 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात 46 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 39 रुग्ण शहरातील आहेत तर 7 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 5 हजार 376 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 3 हजार 337 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 35 हजार 597 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज (शुक्रवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 20 हजार 073 स्वॅब तपासणी करण्यात आली. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 37 हजार 126 इतकी आहे. त्यापैकी 475 रुग्ण गंभीर आहेत, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

दरम्यान, पुणे शहरात वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे पुण्यात शनिवार (दि.3) पासून सात दिवस कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सायंकाळी 6 ते सकाळी 6 यावेळेत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. दिवसभर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. हॉटेल, बार, मॉल, धार्मिक स्थळे बंद राहणार आहेत. तसेच पीएमपी बससेवा देखील बंद राहणार आहे.