Coronavirus in Pune : पुण्यात ‘कोरोना’चा कहर कायम! पुण्यात गेल्या 24 तासात 5313 नवीन रुग्ण, 73 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   मागील काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुणे शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. परंतु रुग्ण संख्येत वाढ होत आहे. पुण्यामध्ये गेल्या 24 तासात शहरामध्ये 5 हजार 313 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर 73 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पुणे शहरात कोरोनाचा कहर सुरुच असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे.

पुणे शहरामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना मृतांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. पुणे शहरात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 39 हजार 823 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात 73 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 55 रुग्ण शहरातील आहेत तर 18 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 5 हजार 856 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 4 हजार 573 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 79 हजार 906 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 21 हजार 166 स्वॅब तपासणी करण्यात आली. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 54 हजार 061 इतकी आहे. त्यापैकी 1086 रुग्ण गंभीर आहेत, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण रुग्णांची संख्या 6 लाख 58 हजार 014 झाली आहे. त्यापैकी 5 लाख 47 हजार 581 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 99 हजार 729 आहे. कोरोनाबाधित एकूण 10 हजार 704 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.63 टक्के इतके आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 83.22 टक्के आहे.