Pune News : पुणे शहरात दिवसभरात 290 ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण, 10 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे शहरात रविवारी (दि.3) 290 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर 420 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (रविवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 4 हजार 082 स्वॅब तपासणी करण्यात आली.

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 250 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहे. यापैकी 155 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर 95 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. आज दिवसभरात 10 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 3 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. आतापर्यंत 4 हजार 082 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 2 हजार 909 इतकी आहे. शहरात आजपर्यंत 1 लाख 79 हजार 598 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 1 लाख 72 हजार 042 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. या साथीच्या आजाराविरोधात अनेक देशातील शास्त्रज्ञ लसींवर युद्धपातळीवर काम करत आहेत. यात भारतानेही मुख्य भूमिका बजावली आहे. या सुरु असलेल्या युद्धादरम्यान, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) सीरम संस्था आणि भारत बायोटेक लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याला एका उत्साही लढाईचा टर्निंग पॉईंट म्हणून वर्णन करत म्हटले की, प्रत्येक भारतीयाला अभिमान असेल कि, आपत्कालीन परिस्थितीसाठी वापरल्या जाणार्‍या दोन लसी भारतात बनविल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी या शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे.