Pune : बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणाऱ्या सराईतास गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी पथकाने केली अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी पथकाने सापळा रचून अटक केली, तर दुसऱ्या कारवाईत पौड पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात फरार असणाऱ्यास पकडण्यात आले आहे.

अविनाश पुंडलिक तांदळेकर (रा. बालाजीनगर, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. यादरम्यान गुन्हे शाखेला शहरात गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यादरम्यान दरोडा व वाहनचोरी पथक सहकारनगर आणि बिबवेवाडी परिसरात पेट्रोलिंग करत असताना बिबवेवाडी येथे भगली हॉस्पिटल रोडवर आल्यानंतर कर्मचारी सुमीत ताकपेरे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सार्वजनिक रोडवर एकजण उभा असून, त्याच्या कंबरेला पिस्तूल आहे. या बातमीची खातरजमा करण्यात आली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक शिल्पा चव्हाण व त्यांच्या पथकातील शेख, मेंगे, शिवतरे, ताकपेरे छापा टाकून त्याला पकडले. झडती घेतली असता, त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे असा 30,800/- रुपयांचा मुद्देमाल मिळाला आहे. दोन गुन्हे दाखल आहेत. यासोबतच दुसऱ्या कारवाईत दोन गुन्ह्यात फरार असलेल्या एकाला पकडण्यात आले आहे. जनार्दन गणपत गायकवाड (रा. खेचरे, ता. मुळशी) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर दरोड्यासह दोन गुन्हे पौड पोलीस ठाण्यात दाखल आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो गेल्या 8 महिन्यांपासून फरार होता. दरम्यान, कर्मचारी सुमीत ताकपेरे यांना त्याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार त्याला पकडले. त्याला पुढील कारवाईसाठी पौड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई अशोक मोराळे सो (अप्पर पो. आयुक्त गुन्हे ), मा. बच्चन सिंग सो (पो. उपायुक्त, गुन्हे ), मा. सुरेंद्र देशमुख सो (सहा. पो. आयुक्त, गुन्हे 1) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शिल्पा चव्हाण व पथकाने केली.