Pune : शहरात जबरी चोर्‍या अन् घरफोड्या करणार्‍या सराईताला गुन्हे शाखेकडून अटक, 9 गुन्हे उघड तर 6.5 लाखाचा माल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात जबरी चोऱ्या आणि घरफोड्या करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट सहाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 9 गुन्हे उघडकीस करत साडे सहा लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अमरसिंग जगरसिंग टाक (रा. गोसावीवस्ती, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

अमरसिंग हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वीचे 6 गुन्हे दाखल आहेत.दरम्यान लोणी काळभोर परिसरात दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीची संट्रो कार त्याला ढकलून देऊन जबरदस्तीने चोरून नेली होती. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना हा गुन्हा अमरसिंग याने केला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी हा गुन्हा त्याने साथीदार जयपालसिंग उर्फ मोन्यासिंग राजपालसिंग टाक यांच्या साथीने केला असल्याचे सांगितले. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने विविध भागात एकूण 9 गुन्हे केले असल्याचे सांगितले आहे. त्याच्याकडून या गुन्ह्यातील 6 लाख 44 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने, कर्मचारी नितीन मुंढे, मच्छिद्र वाळके, राहुल माने, ऋषीकेश टिळेकर, प्रतीक लाहीगुडे, शेखर काटे, नितीन घाडगे व संजय देशमुख यांच्या पथकाने केली आहे.