Pune : शहरातील अवैध धंद्यावर गुन्हे शाखेकडून कारवाई, 15 लाखांचा माल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यावर गुन्हे शाखेने 3 दिवसात जोरदार कारवाई केली असून, वेगवेगळ्या गुन्ह्यात जवळपास 61 जणांना पकडत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 15 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

अवैध प्रकार बंद करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. तरीही छुप्या पध्दतीने अवैध प्रकार सुरूच असल्याचे दिसत होते.. केवळ तीन दिवसात गुन्हे शाखेने शहरात सुरू असलेल्या असंख्य अवैध धंद्यावर कारवाई करत 50 हुन अधिक जणांवर कारवाई केली आहे.

फरासखाना, वारजे माळवाडी, दत्तवाडी, स्वारगेट, येरवडा, हडपसर आणि बंडगार्डन भागात पोलिसांनी 11 ठिकाणी जुगार आड्यावर छापे मारी केली आहे. त्यात 48 हजार रुपये पकडत 38 जणांना खेळताना पकडण्यात आले आहे. तसेच, चतुशृंगी, वारजे, खडकी, येरवडा, मुंढवा, वानवडी यासह इतर भागात प्रॉव्हिबिशन ऍक्टनुसार 7 गुन्हे दाखल केले आहे. तर 7 जणांना अटक केली आहे. त्यासोबतच भारती विद्यपीठ, स्वारगेट, कोथरुड, चतुशृंगी, हडपसर, मुंढवा, कोंढवा, चंदननगर, कोटपा ऍक्टनुसार 4 गुन्हे दाखल केले आहेत. त्यात 18 हजार रुपयांचा ऐवज जप्त करत गुटखा संदर्भात 7 गुन्हे दाखल करत 14 लाख रुपयाचा माल जप्त केले आहेत. तसेच, स्वारगेट भागात गांजा घेऊन आलेल्याना पकडले गेले आहे.

शहरात लॉकडाऊन-अनलॉक झाल्यानंतर हॉटेल चालकांना ठराविक वेळा ठरवून देण्यात आल्या आहेत. पण काहीजण त्या वेळेपेक्षा जास्त हॉटेल सुरू ठेवत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार वारजे माळवाडी, आलंकार, कोथरुड, डेक्कन, लष्कर, बंडगार्डन, कोरेगाव पार्क, भारती विद्यपीठ यासह वेगवेगळ्या परिसरात 97 हॉटेल चेक केले असता त्यात 12 हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे.