कोरोनानं ‘हैराण-परेशान’केलं आणि पुण्यातील गुंडानी बडवलं, पुणेकर तरुणामुळे दुर्घटना टळली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात परराज्यातील मजूर आणि बाहेर जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात राहत असून, या कोरोनाच्या संकटात सापडलेले हे कामगार वर्ग पाई गावची वाट धरत आहे. पण त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुण्यात निर्माण झाला आहे. यवतमाळ येथे निघालेल्या एका तरुणाला पाटील इस्टेट ते संगमब्रिजजवळ अडवून गुंड प्रवृत्तीच्या टोळक्याने बेदम मारहाण करत त्याला लुटण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने येथून जाणाऱ्या एका तरुणाने हा प्रकार पाहून थांबवत त्याची सुटका केली आणि त्याला वाघोलीत सोडले. मात्र यामुळे आधीच कोरोनामुळे हवालदिल झालेल्या या मजुर गुंडाच्या दहशतीत खाली आले आहेत. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

धानोरा परिसरात राहणाऱ्या सुमित यादव या तरुणाने त्यांना वाचवले आहे. तसेच एक व्हिडिओ काढून तो शेअर देखील केला आहे. सुमित मध्यरात्री दुचाकीने संगमब्रिज येथून घरी जात होता. यावेळी त्याला काही मजूर पायी जात असताना दिसले. मात्र यावेळी येथील काही गुंड प्रवृत्तीचे तरुण या मजुरांना अडवून मारहाण करत होते. तसेच त्यांच्याजवळचे मोबाईल, वस्तू आणि पैसे घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना प्रतिकार केल्यानंतर त्यांनी बेदम मारहाण देखील केली. पंरतु त्याचवेळी सुमित याने हा प्रकार पाहिला. त्याने या गुंडाच्या तावडीतून त्यांची सुटका केली. यावेळी सुमितच्या मदतीला देखील काहीजण आले. पण या मजूर तरूणांना बेदम मारहाण करण्यात आल्याचे त्याने या व्हिडीओत सांगितले आहे. तसेच असे प्रकार शहरात घडत असून, ते घडू नये यासाठी काळजी घ्यावी व ते रोखले पाहिजे असे देखील त्याने आवाहन केले आहे. हा तरुण यवतमाळ जिल्ह्यातील आहे. त्याला गावी जायचे होते. तो पाई वाघोली परिसरात निघाला होता. यावेळी त्याच्यासोबत ही धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे मात्र मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.