Pune : कामगार पुरविण्यावरून मारहाण करणार्‍यांना कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कामगार पुरविल्याच्या कारणावरून आठ ते दहा जणांच्या टोळक्याने पुनावळे परिसरात राडा घालून दहशत निर्माण केली. तसेच एका कामगारासह दोघांना दांडक्याने मारहाण केली. त्यात कामगाराच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली आहे.

या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना 5 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

अतिश कांबळे (वय १९) आणि सलीम बसरूद्दीन मुजावर (वय २१, दोघे रा. गहुंजेगाव) अशी पोलिस कोठडी झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात प्रणव गायकवाड (वय १९, रा. गायकवाड वस्ती, पुनावळे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार हिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी प्रणव यांच्याकडे काम करणारा कामगार धीरज कुमार याने आणखी कामगार पुरविल्याच्या कारणावरून उत्तम बोडकेसह आठ ते दहा जणांच्या टोळके प्रणव यांच्या घरासमोर आले. त्यांनी कामगार धीरज कुमार आणि प्रणव यांना मारहाण केली. पोलिसांनी अतिश कांबळेसह दोघांना अटक केली. उत्तम बोडके आणि इतर आरोपींना अटक करणे तसेच गुन्ह्याचा तपासासाठी सरकारी वकिलांनी आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी केली. त्यानुसार त्यांना 5 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.