Pune : दिवसभर लाईट नसताना तुम्ही नेमकं काय करता ? चौघांकडून महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दिवसभर लाईट नसताना तुम्ही नेमकं काय करता असे म्हणत चौघांनी काम करण्यास आलेल्या महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी सचिन जायभय (वय 35) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीत टेक्निशियन म्हणून काम करतात. दरम्यान कोंढवा येथील भाग्यद्योय नगर परिसरात शुक्रवारी दिवसभर लाईट नव्हती. त्यामुळे फिर्यादी हे त्यांच्या सहकार्यासोबत येथील काम करण्यास आले होते. त्यांनी लाईटचा फॉल्ट काढला आणि ते दुरुस्त करण्यास सुरुवात केली.

यावेळी अनोळखी चौघेजण आले. त्यांनी सकाळपासून लाईट नाही. तुम्ही काय काम करता, लोकांना अंधारात ठेवता का, हे काम बंद करा असे म्हणत ते करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. तसेच त्यांनी फिर्यादी यांना अपशब्द वापरत मारहाण केली. याप्रकरणी अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

You might also like