Pune : लॉटरी लागल्याचे सांगून महिलेला 23 लाखांना गंडवले, सायबर भामट्यांचा पराक्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जिओच्या कोन बनेगा करोडपतीमध्ये 25 लाखांची लॉटरी लागल्याचे सांगत एका महिलेकडून सायबर चोरट्यांनी तबल 23 लाख रुपये उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. केवळ तीन म्महिन्यांत त्यांनी हे पैसे भरले आहेत.

याप्रकरणी 39 वर्षीय महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या हिंगणे खुर्द परिसरात राहण्यास आहेत. दरम्यान ऑगस्ट महिन्यात त्यांना व त्यांच्या पतीला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला होता. त्याने आपण जिओ कंपनीमधून बोलत असून, तुम्हाला “कोन बनेगा करोडपती”मध्ये तुमच्या जिओ नंबरला 25 लाख रुपयांची लॉटरी लागली असल्याचे सांगितले. तसेच त्यांचा विश्वास संपादन केला. यानंतर त्यांना टॅक्स, इन्शुरन्स यासाठी काही पैसे भरावे लागतील असे सांगितले. तर त्यांना व्हाट्सअपद्वारे तिकीट आणि इतर माहिती पाठवून त्यांच्याकडून 23 लाख 41 हजार रुपये भरण्यास भाग पाडले. पैसे भरल्यानंतर देखील त्यांना लॉटरीची रक्कम मिळाली नाही. उलट आणखी कारणे सांगून त्यांच्याकडून पैसे घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आले.

यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवर प्राथमिक तपास केला. त्यानंतर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑगस्ट ते नोव्हेंबर 2020 या कालावधीत हा प्रकार घडला आहे. अधिक तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.