पुण्यातील नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजातील विद्यार्थ्यांनी व्याजाच्या पैशासाठी केला खून, फेकून दिलं 11 व्या मजल्यावरून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – व्याजाने दिलेले 15 हजार रुपये परत देत नसल्याच्या कारणावरून तीन विद्यार्थ्यांनी एका तरुणाला अकराव्या मजल्यावरून खाली ढकलून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोंढव्यातील खडीमशिन चौकात हा प्रकार मध्यरात्री घडला आहे.

सागर चिलवेरी (वय 24, रा. सोलापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अभिनव जाधव, अक्षय गोरडे आणि तेजस गुजर या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत ओंकार चंद्रकांत येणपुरे (वय 20) याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर आणि आरोपी एकमेकांचे मित्र आहेत. अभिनव, तेजस व अक्षय हे एका नामांकित महाविद्यालयात इंजिनिअरींगचे शिक्षण घेत आहेत. सर्वजन खडीमशिन येथील कुल सोसायटीत भाड्याने राहात होते. सागरही त्यांच्यासोबत राहत होता. तो मिळेल ते काम करत होता.

दरम्यान, तिघांनी सागर याला 10 टक्के व्याजाने 15 हजार रुपये दिले होते. परंतु, सागर त्यांना पैसे परत देत नव्हता. रात्री आरोपींनी त्याला दुचाकीवर जबरदस्तीने बाहेरून सोसायटीत आणले. यानंतर ते सर्वजन फ्लॅटवर गेले. त्याठिकाणी त्यांनी पैसे देण्यावरून सागरशी वाद घालण्यास सुरूवात केली. या वादातून तिघांनी सागर याला रात्री सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास 11 व्या मजल्यावरून खाली ढकलून दिले. 11 व्या मजल्यावरून कोसळल्याने सागर याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या तिघांना ताब्यात घेतले.

यावेळी सागर खाली पडला असून, त्याने उडी मारली असल्याचे सर्वांना वाटत होते. परंतु, सागर याला ढकलून देऊन त्याचा खून केल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.