Pune : लॉकडाऊनच्या भीतीने कष्टकरीवर्गाची गावाकडे धाव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य शासनाच्या कडक निर्बंधानंतर विकेंडचा लॉकडाऊन आणि आता पुन्हा लॉकडाऊन कधी जाहीर केला जाईल, या भीतीमुळे अनेकांनी गावाकडे धाव घेतली आहे. हडपसरमधील रविदर्शनसमोर एस.टी. बस थांब्यावर गावाकडे जाण्यासाठी कामगारवर्गाने गर्दी केली होती. एस.टी. बससह मिळेल त्या वाहनाने कामगारवर्ग आई-वडिलांसह लेकराबाळांना घेऊन गावाकडे जात असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले.

कोरोनाची प्रचंड भीती वाढत आहे. कडाक्याचे उन वाढत आहे. रोजगार मिळत नाही, उपाशी मरण्याची वेळ आली आहे. आम्हाला घरामध्ये बसून राहायला आवडत आहे. मात्र, पोटाचे काय करायचे, घरभाडे कसे द्यायचे असा प्रतिप्रश्न या मंडळींकडून उपस्थित केला जात आहे. मागिल वर्षी पहिल्या लॉकडाऊनमध्ये अनेक सामाजिक संस्था, संघटनांनी अन्नधान्याचे कीट वाटले, त्यामुळे काही त्रास जाणवला नाही. मात्र, मागिल महिन्याभरापासून कोरोनाचे संकट गडद होत असल्याने अनेक ठिकाणची कामे बंद झाली आहेत. हॉटेल व्यवसाय पूर्णपणे बंद नसला तरी अवघा 10-15 टक्के सुरू आहे. त्यामुळे तेथील कामगारवर्ग बेकार झाला आहे. बांधकामे ठप्प झाली आहेत, कुठेही कामधंदा मिळत नाही, आता इथे राहून करायचे तरी काय अशी विचारणा या मंडळींकडून केली जात आहे.

पाऊस नाही, पाणी नाही त्यामुळे गावाकडे शेती पिकत नाही, म्हणून पोटापाण्यासाठी शहराकडे धाव घेतली. गावाकडे दुष्काळ आणि मागिल दोन वर्षांपासून कोरोना आमचा पिच्छा पुरवत आहे. आम्ही जगायचे तरी कसे असा संतप्त राज्यासह परराज्यातून शहरात रोजगारासाठी आलेल्या कामगारवर्गाकडून सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, दहावी-बारावीतील मुलांची परीक्षा आहे, त्यामुळे काहींनी इथेच राहणे पसंत केले आहे. मात्र, ज्यांना काहीच आधार नाही, अशा मंडळींनी परीक्षेच्या वेळी परत येऊ अशी भूमिका घेतली होती. परीक्षा पास होऊन तरी कुठे नोकरी मिळणार आहे. आम्ही पदवीपर्यंत शिक्षण घेतले, नोकरी मिळाली नाही म्हणून रोजंदारीवर काम करीत आहे. आता यांना तरी कुठे लगेच सरकारी नोकरी लागणार आहे, असे सांगायलाही कमी केले नाही.