Pune : बिलासाठी मृतदेह 3 दिवस कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवणार्‍या तळेगावातील मायमर हॉस्पिटलविरुद्ध FIR दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन  –  कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यु झालेल्या रुग्णाचे बिल दिले नसल्याने तब्बल ३ दिवस मृतदेह कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवणार्‍या मायमर मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटल प्रशासनावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी सुधीर गणेश लोके (वय २८, रा. मळवली, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना तळेगाव स्टेशन येथील मायमर हॉस्पिटलमध्ये १ मे रोजी घडली होती.

सुधीर लोके यांचे वडील गणेश शंकर लोके (वय ५०) कोरोनाची लागण झाली असल्याने त्यांच्यावर मायमर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत होते. त्यांचे उपचारादरम्यान १ मे रोजी निधन झाले होते. मात्र, सुधीर हे हॉस्पिटलचे बील भरु शकले नाही. त्यामुळे हॉस्पिटल प्रशासनाने त्यांच्या वडिलांचा मृतदेह ताब्यात देण्यास नकार दिला व तो मृतदेह कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवून दिला. ही बाब तिसर्‍या दिवशी खासदार श्रीरंग बारणे यांना समजली. बारणे हे स्वत: ३ मे रोजी हॉस्पिटलमध्ये गेले. त्यावेळी कॉलेजच्या प्रमुख डॉ. सुचित्रा नांगरे या त्यांच्यासमोर मृत्यु झालेल्याच्या मुलाशी अरेरावी करत होत्या. गणेश लोके यांच्या मुलाने राज्य सरकारच्या महात्मा फुले आरोग्य योजनेसाठी अर्ज केला होता. त्याला ५० हजार रुपये मंजूर होणार होते. हॉस्पिटलचे बिलही साधारण तेवढेच होते. असे असतानाही हॉस्पिटलने तब्बल ३ दिवस मृतदेह अडवून ठेवला होता. खासदार बारणे यांच्या हस्तक्षेपानंतर हॉस्पिटलने मृतदेह नातेवाईकांकडे सोपविला होता.

लोके यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. हा विषय गंभीर असल्याने व शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक लक्षात घेऊन महसुल अधिकार्‍यांनी अगोदरच हालचाली केल्या. महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी सुधीर लोके यांच्याकडे गेले. त्यांनी विलगीकरणात असतानाही सुधीर यांचा जबाब घेतला. त्यावर त्यांची सही घेतली.
महसुल बैठकीत हा विषय उपस्थित झाला. अजित पवार यांनी कारवाई आदेश दिले. त्यानुसार तळेगाव दाभाडे पोलिसांनी मृतदेहाची अप्रतिष्ठा केली म्हणून मायमर हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.