MBA च्या प्रवेशासाठी बनावट गुणपत्रिका, परप्रांतीय विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एमबीए प्रवेशासाठी एटीएमए टेस्ट फॉर मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन संस्थेच्या बनावट गुणपत्रिका सादर करुन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेश मिळविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपराजिता राज (रा. झारखंड), भोमिरा (रा. बिहार), दिव्या सिंग (रा. झारखंड) आणि शैलेश कुमार सिंग (रा. झारखंड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुरभी जैन (वय ४४, रा. औंध) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपराजिता, भोमिरा, दिव्या सिंग, शैलेश परराज्यातील विद्यार्थी असून त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २०१८-१९ मध्ये एमबीएसाठी प्रवेश घ्यायचा होता. त्यासाठी चौघांनी मिळून एटीएमए टेस्ट फॉर मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन संस्थेच्या बनावट गुणपत्रिका सादर करुन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची फसवणूक केली.

विद्यापीठ प्रशासनाने कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर चौघांनी दिलेल्या गुणपत्रिका बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्यांच्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे अधिक तपास करीत आहेत.

नोकरीच्या आमिषाने सुरक्षारक्षकाची दुचाकी पळविली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रेल्वे सुरक्षा रक्षकाची नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने सुरक्षा रक्षकाची दुचाकी चोरुन नेल्याची घटना घडली आहे. ही घटना दोन दिवसांपुर्वी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पुणे स्टेशन परिसरात घडली.

याप्रकरणी दिलीप डावरे (वय ४१, रा. लोहगाव) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप लोहगाव परिसरातील एका इमारतीचा सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. मित्राच्या ओळखीतून त्यांची एकाशी ओळख झाली होती. त्यानंतर संबंधिताने दिलीप यांना रेल्वेत मोठ्या पगारावर सुरक्षा रक्षकाची नोकरी लावण्याचे आमिष दाखविले.

त्यासाठी दोन दिवसांपुर्वी बोलणी करण्यासाठी चोरट्याने दिलीपला पुणे स्टेशन परिसरात बोलाविले होते. दोघांनी एका हॉटेलमध्ये चहा पिल्यानंतर चोरट्याने दिलीपला जवळच मित्राला भेटून येतो असे सांगत त्यांच्याकडून दुचाकीची चावी घेतली. त्यानंतर चोरट्याने दिलीप यांची दुचाकी घेऊन पळ काढला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/