चालकाच्या प्रसंगावधानाने अपघात टळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहर आणि परिसरातून वाहणाऱ्या बेबी आणि मोठ्या कालव्याची भिंत व संरक्षण जाळीची ठिकठिकाणी पडझड झाली आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. तरीसुद्धा ढिम्म प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेमुळे अद्याप त्याची दुरुस्ती झाली नाही. बुधवारी (दि. 17 जून) रात्री हडपसर (हिंगणेमळा) येथे कालव्यावरील रस्त्यावर काँक्रिकटचा मिक्सर कलंडला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला, असे शिवसेनेचे कार्यकर्ते महेंद्र बनकर यांनी सांगितले.

बनकर म्हणाले की, कालव्यालगत अतिक्रमण वाढत आहेत, त्यामुळे कालव्याच्या भरावालाही धोका निर्माण झाला आहे. मुंढवा जॅकवेल ते खुटबावपर्यंत वाहणाऱ्या बेबी कालवा बुजवून पात्र अरुंद केले आहे. तसेच अनेक ठिकाणी कालव्यात पत्र्याचे शेड मारले आहेत. याबाबत महापालिका आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला तरीसुद्धा त्यावर कारवाई केली जात नाही. पालिका प्रशासन म्हणते पाटबंधारे विभागाचे काम आहे, पाटबंधारे विभागाचे अधिकारी प्रतिसादच देत नाहीत, असे त्यांनी सांगितले.

मागिल महिन्यात हडपसरमधील कामठेवस्ती दाणीबाई विहिरीजवळ मोठा कालवा पाझरत होता. त्यावेळी स्थानिक नगरसेवक योगेश ससाणे यांनी तातडीने पाटबंधारे विभागाला सांगून पाण्याचा प्रवाह बंद केला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. त्यानंतर चार दिवसांत कालव्याची दुरुस्ती केल्यानंतर पाण्याचा प्रवाह सुरू केला. आता तरी पाटबंधारे विभागाने तातडीने लक्ष घालून अतिक्रमणांवर ठोस कारवाई करून कालवा अतिक्रमणमुक्त करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

महापालिका प्रशासनाने कालव्याच्या भरावावर रस्ता केला. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना अपघाताचा धोका होऊ नये म्हणून जाळी बांधली. रस्ते ठिकठिकाणी खचले आहेत, जाळी तुटली आहे, त्यामुळे वाहनचालकाचा थेट कालव्यात बुडून मृत्यू होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली. मागिल तीन महिन्यापासून लॉकडाऊनमुळे वाहनांची वर्दळ कमी होती, त्यामुळे रस्ता आणि जाळीची दुरुस्ती का केली नाही, असा सवालही बनकर यांनी उपस्थित केला आहे.