पुण्यातील माणिकबागेत उच्चशिक्षित तरुणीचा मृतदेह आढळल्याने प्रचंड ‘खळबळ’

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरातील सिंहगड भागात उच्चभ्रू परिसरात एका उच्चशिक्षित तरुणीचा राहत्या घरात मृतदेह आढळून आला आहे. तरुणी हिंजवडीत नोकरी करत होती. तेजशा शामराव पायाळ (वय 29, माणिकबाग) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजशा मूळची बीड जिल्ह्यातील आहे. तिचे MBA चे शिक्षण झाले असून हिंजवडी येथील एका कंपनीत नोकरी करत होती. दरम्यान माणिकबाग येथील राधाकृष्ण आपर्टमेंटमध्ये राहत होती. तिची आई आणि दोन बहिणीही तिच्यासोबत राहत होत्या. दिवाळीनिमित्त तेजशा आणि आई व बहिणी गावी गेल्या होत्या. पाच दिवसांपूर्वी तेजशा एकटीच गावावरून आली. दरम्यान, तिचा गेला दोन दिवस फोन लागत नव्हता. यामुळे तिची आई काल दुपारी पुण्यात आली. त्यांना घरी गेल्यानंतर तेजशाचा मृतदेह आढळला. यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तेजशा हिच्या गळ्यावर व्रण असल्याचे समोर आले आहे. घरात दारूच्या बाटल्याही मिळाल्या आहेत. त्यामुळे तिचा खून करण्यात आला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. आज शवविच्छेदन होणार आहे. त्यांनतर मृत्यूचे कारण समोर येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. अधिक तपास सिंहगड पोलीस करत आहेत.

Visit : policenama.com