पुण्यातील शिवणे परिसरातील 9 दुकाने फोडली, शहरात घरफोड्यांचे सत्र कायम

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन शहरात घरफोड्यांचे सत्र कायम असून, चोरट्यांनी शिवणेत 9 दुकाने फोडल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी गल्ल्यातील 1 लाख 22 हजार रूपयांची रोकड चोरून नेली असून, रविवारी हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवणे येथे अग्रवाल गोडाऊनजवळ विविध दुकाने आहेत. दुकानदारांनी नेहमी प्रमाणे रात्री दहा वाजता दुकाने बंद करून गेले. त्यानंतर चोरट्यांनी पहाटे तीनपर्यंत परिसरातील नऊ दुकाने फोडली. चोरट्यांनी अर्हम डिस्ट्रीब्युटर मेडिकल स्टोअर्स, त्याच्या शेजारील किराणा दुकान यांच्या गल्ल्यामधून एक लाख दोन हजार रूपये चोरुन नेले आहेत. तसेच, या दुकानाचा अजूबाजूला असलेल्या सात दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश करत गल्ल्यातील रोकड चोरली आहे. यातील काही दुकानांमध्ये चोरट्यांना काहीही हाती लागलेले नाही.

पहाटेच्या सुमारास शटर उघडे दिसल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर वारजे पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या दुकानाच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्यांचा माग काढण्यात येत असल्याचे वारजे पोलिसांकडून सांगण्यात आले.