Coronavirus Impact : पुण्यातील मार्केटयार्ड ‘या’ तारखेपासून अनिश्चित काळापर्यंत बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे शहरातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्केटयार्डमधील कामगार, तोलणार संघटना आणि टेम्पो संघटनांनी शुक्रवार १० एप्रिलपासून कोणत्याही बाजारात येणार नसल्याचे बाजार समितीला कळविले आहे. त्यामुळे शुक्रवारपासून अनिश्चित काळासाठी मार्केटयार्ड बंद राहणार आहे. तसेच मार्केटयार्ड आडते असोसिएशनने १० एप्रिलपासून फळे,भाजीपाला, कांदा -बटाटा व केळी चा घाऊक व्यापार पुढील निर्णय होईपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीला कळविले आहे.

मार्केटयार्ड परिसरात सध्या कर्फ्यु लावण्यात आला आहे. फक्त मार्केट यार्डमध्ये बाहेरुन मालाची आवक होत आहे़ व घाऊक व्यापार्‍यांनाच येथे खरेदीसाठी परवानगी दिली जात आहे. बाहेरुन आलेले ट्रक, टेम्पो यांना गटा गटाने आत प्रवेश दिला जात आहे. मार्केटयार्ड मधील कामगार युनियन, तोलणार संघटना, टेम्पो संघटना यांची ७ एप्रिल रोजी संयुक्त बैठक झाली आहे.

मार्केट यार्ड परिसर व त्याचा पूर्वेकडील भाग हा सील करण्यात आला आहे. त्यामुळे कामगार, तोलणार, टेम्पो संघटनाचे सर्व सदस्य १० एप्रिलपासून मार्केटयार्डात येणार नाही़ त्यामुळे येथील चढउतार बंद होणार आहे. त्यामुळे आडते असोसिएशनने १० एप्रिलपासून बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. १० एप्रिलपासून कोणत्याही प्रकारच्या शेतमालाची आवक मागवू नये, त्याचप्रमाणे बाजारात आडत्यांच्या गाळ्यावर शेतमाल शिल्लक राहिल्यास तो माल १० एप्रिलपर्यंत बाजार पेठेतून बाहेर घेऊन जाण्यास बाजार समिती सहकार्य करेल, असे आडते असोसिएशनने पत्रकात म्हटले आहे.