पुणे महापालिकेचं वैद्यकीय महाविद्यालय पुढील वर्षी सुरू करण्याची शिफारस

पुणे – पुढील शैक्षणिक वर्षात २०२१-२२ मध्ये १०० विद्यार्थ्यांसह हे महाविद्यालय सुरू करण्याची शिफारस केली होती. ही शिफारस राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाकडे विद्यापीठाने केली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचा सुधारित प्रस्ताव महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने मान्य केला. अवघ्या दोनच दिवसांत हा सकारात्मक प्रतिसाद आल्याने महाविद्यालय उभारणीचा महत्त्वाचा टप्पा पार आहे. हे वैद्यकीय महाविद्यालय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने उभारणार आहे. दरम्यान, महापौर मुरलीधर मोहोळ स्थायी समिती अध्यक्ष असताना ही संकल्पना मांडली. या संदर्भात गेले दोन वर्षे पाठपुरावा केला. मुख्य सभेच्या मान्यतेनंतर महाविद्यालयासाठी ट्रस्ट स्थापन करण्यात आला. असं महापालिकेनं या वैद्यकीय महाविद्यालयासाठी अंदाजपत्रकात तरतूद केलेली आहे. या महाविद्यालयासाठी डॉक्टर नायडू रुग्णालयाची बारा एकर जागा निश्चित करण्यात आली आहे अहमदाबाद येथील महापालिकेने उभारलेल्या वैद्यकीय महाविद्यालय धर्तीवर हे महाविद्यालय उभारले जाणार असल्याचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर अंजली साबणे यांनी सांगितले. राज्य शासनाकडून महाविद्यालयासाठी न्यास स्थापन करण्यास परवानगी मिळाली. त्यानंतर धर्मादाय आयुक्तांकडे न्यासाची नोंदणी केली.

हा प्रस्ताव मुंबईतील वैद्यकीय शिक्षण संचालक आणि नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्याकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावात महाविद्यालयाची जागा मालकीची असणे आवश्यक असल्याची त्रुटी काढली होती. पालिका प्रशासनाने महापालिकेच्या मालकीची जागा न्यासाला देण्यास मान्यता दिली.

कागदपत्रांची पूर्तता करून हा प्रस्ताव एमएचयूएसला सोमवारी पाठविला होता. हा प्रस्ताव विद्यापीठाने मान्य केला. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या आधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर अंतिम मान्यतेची प्रक्रिया पार पडणार असल्याचं डॉ. साबणे यांनी सांगितलं.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला पाठवण्यात आलेल्या प्रस्तावानुसार, सामंजस्य करारातील अटी व शर्तींच्या अधीन राहून २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून शंभर विद्यार्थी क्षमतेसह विद्यालय सुरू करण्यासाठी राज्य शासनाला शिफारस करण्यात आली. हा प्रस्ताव पाच वर्षांसाठी वैध राहणार आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे वैद्यकीय महाविद्यालयाच्या मान्यतेसाठी अंतिम प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याला मान्यता मिळाली. तसंच महाविद्यालयाची शिफारस वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाकडे करण्यात आली आहे. याबाबत माझी चर्चा डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. सचिव स्तरावरील कार्यवाहीसुद्धा लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. वैद्यकीय शिक्षण संचालनालय आणि मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडून मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश सुरू होऊ शकतील. याबाबत महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे.
– रुबल अग्रवाल,अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगरपालिका

2017 साली मी स्थायी समितीचा अध्यक्ष असताना ही संकल्पना मांडली होती. दोन वर्षांपासून या विषयाचा पाठपुरावा करत आहे. ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णालय उभारणे, ट्रस्ट नोंदणी आणि परवानगीसाठी एमयूएचएसला प्रस्ताव सादर करणे हे सकारात्मक शिफारस राज्य शासनाकडे केली. हा महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला आहे. यानंतर आता अंतिम मान्यता आणि महाविद्यालय प्रत्यक्षात उभी राहण्याची प्रक्रिया सुरू आहे.
– मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे